खरी कुजबुज: बाबू खूश हुआ!

Khari Kujbuj Political Satire: ‘सनबर्न’ साठी कोणीच पुढे येत नाही व लोकांचाही विरोध आहे, त्यामुळे कळंगुटचे आमदार मायकल लोबो खूप दिवसांनी जागे झालेत
Khari Kujbuj Political Satire:  ‘सनबर्न’ साठी कोणीच पुढे येत नाही व लोकांचाही विरोध आहे, त्यामुळे कळंगुटचे आमदार मायकल लोबो खूप दिवसांनी जागे झालेत
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

बाबू खूश हुआ!

गोव्यात बाबू पुष्कळ आहेत. हे बाबू आहेत, माजी उपमुख्यमंत्री तथा केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर. दक्षिण गोवा भाजप कार्यालयात एका कार्यक्रमात वक्ते डॉ. मनोज कामत यांनी भाजपमध्ये तळागळातील कार्यकर्ते उच्च पदावर पोहचू शकतात, याचे उदाहरण देताना पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याबरोबर बाबू कवळेकर यांचेही नाव घेतले. तेही तळागळातील कार्यकर्ते असून त्यांच्यात पुन्हा एकदा केप्याचे आमदार बनून उच्चपदी कार्य करण्याची धमक असल्याचे सांगितले. डॉ. कामत यांचे हे उद्‍गार ऐकून सभागृहातील लोकांपैकी कोण जास्त खूश झाले असतील तर ते बाबू कवळेकर. बाबू डॉ. कामत यांना पाहून गालातल्या गालात हसत होते, हे सर्व उपस्थितांनी पाहिले. डॉ. मनोज कामत यांच्या तोंडात साखर पडो, असे त्यांनी मनातल्या मनात म्हटले असावे, असे सभागृहातील लोक पुटपुटत होते. ∙∙∙

लोबोंना ‘सनबर्न’चा कळवळा

दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सव आयोजनाला कडाडून विरोध झाल्यानंतर हा मोर्चा आता बार्देश तालुक्यातील कामुर्ली गावाकडे वळला आहे. या महोत्सवातून सरकारला महसूल तर मिळतोच, मात्र त्याव्यतिरिक्त या महोत्सवाशी संबंधित असलेल्यांनाही मलिदा मिळतो. सनबर्न डिसेंबरअखेरीस आयोजित होत असला तरी त्याची तिकीट विक्री तसेच जाहिरात सहा महिने अगोदरच सुरू होते. गोव्यातील किनारी भागात झाल्यास त्याला देश-विदेशातून पर्यटक उपस्थिती लावतात. या महोत्सवामुळे कर्ण कर्कश आवाजाचा त्रास त्याच्या सभोवती असलेल्या वस्तीला होतो. यामुळे अनेकदा हायकोर्टात जनहित याचिकाही सादर होतात. ‘सनबर्न’ साठी कोणीच पुढे येत नाही व लोकांचाही विरोध आहे, त्यामुळे कळंगुटचे आमदार मायकल लोबो खूप दिवसांनी जागे झालेत. हा महोत्सव व्हावा, असे त्यांना वाटते व जर कोणाला नको असेल तर तो कळंगुट मतदारसंघात आयोजित करण्यास पुढे सरसावले आहेत व पाठिंबाही व्यक्त केला आहे. त्यांना या आयोजकांचा इतका कळवळा का आलाय, हे लोकांना माहीत आहे.. ∙∙∙

आधी गोवा डेअरी सुधारा!

गोवा डेअरीच्या सरकारनियुक्त प्रशासकीय समितीचे काम सध्या चांगले चालल्याचे खुद्द दूध उत्पादकांनीच स्पष्ट केले. गेला बराच काळ गोवा डेअरीच्या कामकाजाबद्दल चांगले नव्हे तर वाईटच सर्वांत जास्त कानोकानी झाले होते. पण आता प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोवा डेअरी पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. तरीही राज्यातील सुमूलमुळे गोवा डेअरीला फटका बसत आहे, हेही तेवढेच खरे आहे. दूध उत्पादक सुमूलकडे कसे वळवता येतील याकडे काही राजकारण्यांचे लक्ष आहे, अशा परिस्थितीत गोवा डेअरी ही गोमंतकीय दूध उत्पादकांची शिखर संस्था असल्याने ती सुधारली पाहिजे, हा विचार या राजकारण्यांच्या मनात रूजला पाहिजे, असे खुद्द दूध उत्पादकच म्हणताहेत. ∙∙∙

मच्छिमारी व्यावसायिकांना चिंता

मासेमारी मग ती परंपरागत असो वा यांत्रिक, गोव्यातील तो एक मुख्य व्यवसाय आहे. पण त्याच्या भवितव्यासमोर हल्लीच्या काळांत अनेक समस्या उभ्या रहाताना दिसत असून भविष्यात त्या अधिक बिकट होऊ शकतात, अशी चिंता बडे व्यावसायिक व्यक्त करताना दिसतात. अनिश्चित व वादळी हवामान यामुळे या व्यवसायांतील अधिक कालावधी म्हणे वाया जातो. गेल्या काही वर्षांतील हा सततचा अनुभव असला तरी आता मानवीय संकटे त्यांच्या समोर उभी राहू लागली आहेत. शेजारी राज्यांतील मासेमारी नौका गोव्यांतील सागरी हद्दीत येऊन मासेमारी तर करतातच पण आतां त्यांत बुल ट्रॅालींगची भर पडली असून एकाच वेळी एकमेकांना दोरखंडाने बांधून ही मासेमारी होते व ती तशीच चालू राहिली तर भविष्यांत मत्स्य दुष्काळाची भीती हे व्यावसायिक व्यक्त करतात.एका स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकाने या बुलट्रॅालिंगचे व्हिडिओ शूटींग करून हा प्रकार सरकारच्या नजरेस आणला आहे व या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. कुटबण बाबत त्वरित पावले उचललेले मुख्यमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे मच्छिमारांचे लक्ष लागून आहे.∙∙∙

फोंड्यातील नेत्यांचे वाढदिवस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फोंड्यातील भाजप नेते व मंत्र्यांच्या वाढदिवसाला रात्री येऊन केक कटिंग करत असल्यामुळे त्यांना फोंड्याची दुर्दशा दिसत नसावी, असे वक्तव्य नुकतेच जनता दरबार करता फोंड्यात आलेल्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यापुढे अशा नेत्यांच्या वाढदिवसाला दिवसा यावे जेणेकरून केक कटिंग बरोबर फोंड्याच्या दुरावस्थेची त्यांना जाणीव होऊ शकेल, असा सल्लाही युरींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला. बघूया मुख्यमंत्री त्यांचा हा सल्ला मनावर घेतात काय ते. पण हा त्यांचा उपरोधिक ‘सल्ला’ फोंड्यात आज चर्चेचा विषय बनला एवढे मात्र निश्चित. ∙∙∙

राजेशकडून मागणी कधी?

राज्यात उत्तर गोवा की दक्षिण गोव्यात सनबर्न होणार यावरून वादंग सुरू झाला आहे. दक्षिण गोव्यात सनबर्न नेण्यासाठी म्हणे सत्ताधारी पक्षातील नेते आसुसलेले असल्याने त्याला विरोध करणारा गट निर्माण झाला आहे. वागातोर येथे दरवर्षी होणारा ‘सनबर्न’ आयोजकांना गतवर्षी जो अनुभव आला तो पाहता त्यांनी परत गोव्यात येणार नाही, असे सांगितले होते. परंतु डिसेंबर मध्ये होणाऱ्या ‘सनबर्न’ची आॅनलाईन तिकीट विक्री काही महिन्यापासून सुरू झाल्याने नव्या वादाला सुरूवात झाली. दक्षिणेतील विरोध पाहता काहींनी उत्तर गोव्यात पुन्हा तो कार्यक्रम आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, कुंभारजुवेत सनबर्न व्हावा, अशी इच्छा बोलून दाखवणारे आमदार राजेश फळदेसाई हे अजून गप्प कसे, अशी विचारणा होऊ लागली आहे. ∙∙∙

अधिकाऱ्यांची होणार पोलखोल!

विधानसभा अधिवेशन संपल्यापासून मुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्यांचा आढावा घेण्याबरोबरच अधिकाऱ्यांनाही कामांबाबत धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यांनी ही सुरवात केली असली तरी इतर मंत्र्यांनी मात्र मवाळ धोरण अवलंबले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची तर त्यांनी झोपच उडवली आहे. गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या या अधिकाऱ्यांनी काय काय कारनामे केलेत, ते उघडकीस येतील याची धास्ती त्यांना वाटतेय. ‘कमिशन’शिवाय कंत्राटदारांच्या कामाची बिले मंजूर होत नाहीत, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. यापूर्वी या खात्याचे अनेक मंत्री झाले, मात्र कोणी असा कडक पवित्रा घेतला नव्हता. कारण हे अधिकारीच मंत्र्यांच्या मर्जीनुसार कामे करत होते व कंत्राटदारांना कामे देत होते. ‘मेरी भी चूप व तेरी भी चूप’ प्रमाणे या खात्यात कुरण सुरू होते. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आल्यापासून अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेय. अधिकाऱ्यांच्या बदल्या अटळ असल्याने काहींनी मंत्र्यांकडे धाव घेतली आहे. मात्र, यापूर्वी जे इतर मंत्र्यांना जमले नाही ते मुख्यमंत्र्यांनी केल्याने ते जनतेच्‍या प्रशंसास पात्र ठरले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:  ‘सनबर्न’ साठी कोणीच पुढे येत नाही व लोकांचाही विरोध आहे, त्यामुळे कळंगुटचे आमदार मायकल लोबो खूप दिवसांनी जागे झालेत
खरी कुजबुज: लोबोंच्या दोरीउड्या...

‘इंडिया’ अलायन्सबाबत तर्क-वितर्क

लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात भाजपाला टक्कर देण्यासाठी ‘इंडिया’ अलायन्स स्थापन झाली व तिने दक्षिण गोव्यात आपला प्रभाव दाखवला खरा. पण उत्तरेत त्याचा तसा विशेष उपयोग झाला नाही व भाजपाचे भाऊ सहजपणे निवडून आले व त्यांनी केंद्रात पुन्हा मंत्रिपदही मिळविले. पण तो मुद्दा नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आगामी म्हणजे २०२७ मधील विधानसभा निवडणुकीसाठीही हे अलायन्स राहिल, असे अनेक पक्ष नेत्यांनी म्हटले होते. पण प्रत्यक्षात गेल्या महिना दोन महिन्यात कॉंग्रेस, ‘आप’ सारख्यांनी अनेक मतदारसंघात पक्ष विस्ताराचे जे काम हाती घेतले आहे, ते पहाता खरोखरच हे ‘अलायन्स’ तग धरेल का, असे प्रश्‍न त्यांतील पक्षच करू लागले आहेत.‘आप’ने म्हणे सासष्टीतील बाणावली व वेळ्ळी या मतदारसंघाबरोबरच आणखी किमान चार मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे तर उत्तर गोव्यात कॉंग्रेसने काही मतदारसंघात सुरू केलेल्या कामामुळे ‘आप’वाले त्रस्त आहेत. खरे तर ‘अलायन्स’च्या घटकपक्षांनी आताच मतदारसंघ वाटून घेणे गरजेचे होते, पण त्याकडे लक्ष न देता सुरू असलेल्या या हालचाली ‘अलायन्स’च्या भवितव्यावर प्रश्‍न उपस्थित करत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com