खरी कुजबुज: गोवा में सब चलता है!

Khari Kujbuj Political Satire: गोव्यात कॉंग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या अनेकांची दिवाळी कटू जाणार आहे. विशेषतः दिगंबर कामत यांची. एकटे आलेक्स सिक्वेरा वगळता सर्वांना भाजपने अक्षरशः वाळीत टाकले आहे
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा में सब चलता है!

अटल सेतूवर दरदिवशी वाहन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे व्हिडियो व्हायरल होतात. हा नित्याचा क्रम झाला असून पर्वरी आणि मेरशी बाजूला पोलिस उभे राहून उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठवतात. परंतु उल्लंघनाचे सत्र काही थांबेल असे दिसत नाही, कारण २४ तास पोलिस बंदोबस्त असत नाही. त्यात जवळपास ९०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा न बसवल्याने येथे सर्रासपणे नियम धाब्यावर बसवले जातात.

मुंबई सारख्या ठिकाणी पुलांवर कॅमेऱ्यांसहित वेग मोजणारे यंत्र बसवल्याने नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचे चलन थेट मोबाईलवर येते. त्यामुळे चालकांमध्ये निदान भीती असते. गोव्यात मात्र सब चलता है, अशी मानसिकता झाल्याची दिसते.

दिगंबरची ‘दिवाळी’

गोव्यात कॉंग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या अनेकांची दिवाळी कटू जाणार आहे. विशेषतः दिगंबर कामत यांची. एकटे आलेक्स सिक्वेरा वगळता सर्वांना भाजपने अक्षरशः वाळीत टाकले आहे. दिगंबर कामत यांना त्यामुळे दिवाळीत कोणताही पदार्थ गोड लागणार नाही.

एवढे की, भाजपवाले म्हणतात की दिगंबरना काहीच प्राप्त झाले नाही, याचे त्यांनाच वाईट वाटते! दिगंबरही काही महिन्यांपूर्वी फुशारक्या मारायचे की, त्यांना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांनी बोलावून घेतले आहे. परंतु सध्या ज्या पद्धतीने त्यांच्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष केले जाते, त्याबाबत भाजपातही गूढ संशय व्यक्त केला जातो!

दूधसागर पर्यटन विषय सोडवा हो...

कुळेतील दूधसागर पर्यटन हंगामासंबंधी सध्या प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एरव्ही २ ऑक्टोबरला सुरू होणारा हा पर्यटन हंगाम अजून सुरू झालेला नाही, तरीही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खरे म्हणजे हा विषय सामंजस्याने मिटवायला हवा. पर्यटनावर त्याचा परिणाम होता कामा नये. पर्यटकांचे दूधसागर पर्यटन हे आवडीचे ठिकाण आहे, म्हणून वर्षभरात लाखो पर्यटक दूधसागरला भेट देतात.

अशावेळेला सरकार आणि टूर ऑपरेटरवाल्यांनी कुणी तरी एक पाऊल मागे घेऊन पर्यटनाला वाव करून द्यायला हवा. पण राजकीय कुरघोडीच्या प्रयत्नांत आणि श्रेयवादासाठी चाललेल्या सुंदोपसुंदीत पर्यटनाची हानी होत आहे. आधीच पर्यटनाचे दिवसही कमी आहेत, त्यात पाऊस असल्याने पर्यटनाला बाधा पोहचतेय, त्यामुळे हा विषय मिटवण्यात सरकार आणि टूर ऑपरेटर पुढाकार घेतील, अशी अपेक्षा गोमंतकीयांची आहे.

Khari Kujbuj
खरी कुजबुज: रवी नाईक पुन्हा फोंड्याचे आमदार?

‘ओव्हरस्मार्ट सिटी’

पणजी स्मार्ट करण्यासाठी कोट्यवधी रुपये स्वाहा केले असले तरी स्मार्ट होण्याचे चिन्ह दिसत नाही. दरवेळी पाऊस येऊन स्मार्ट सिटीचे पितळ उघडे पाडण्याचे काम करतो. काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे पणजी वॉटर सिटी झाली, कारण शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबले. चार चाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्यांनी याचे व्हिडियो काढून ते व्हायरल केले.

करदात्यांच्या पैशांचा कसा दुरुपयोग करावा, याचे उदाहरण असल्याच्या काही प्रतिक्रिया आल्या. काहींनी तर ही ‘ओव्हर स्मार्ट सिटी’ असल्याची प्रतिक्रिया देऊन सरकारची थट्टा केली. आमदारांनी थोडी कळ सोसा चांगले रस्ते मिळतील, असे सांगितल्याने दोन वर्षांचा त्रास, गैरसोय सहन करूनही शहराची ही दशा पाहून लोकांना संताप अनावर झाल्याचे सोशल मीडियावर दिसले.

आता बाबूश निर्धास्त..!

राज्यातील भाजपने १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात चार लाख सदस्य नोंदणीचे ध्येय ठेवले आहे. सदस्य नोंदणीत सत्तरी तालुका आघाडीवर आहे. तर सर्वात कमी सदस्य नोंदणी पेडणे मतदारसंघात झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. सर्वात मोठी बाब म्हणजे मनोहर पर्रीकर हयातीत असतानाही भाजपला जेमतेम मतदान होत राहिले आहे. आता पणजीत भाजप सदस्य नोंदणी १४ हजारांवर गेल्याने ही आकडेवारी निश्‍चित आश्‍चर्यकारक आहे.

८० टक्के मतदान झाले तरी आरामात येथील भाजपचा उमदेवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे सध्याची आकडेवारी मोन्सेरात यांना नक्कीच नवलाची असेल. यासाठी पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष संजीव देसाई यांच्या कष्टाचीही चर्चा मूळ भाजप कार्यकर्त्यांत सुरू आहे. एवढे सर्व भाजपचे सदस्य असतील तर पणजीत भाजप अधिक मजबूत मानायला हवा, त्याशिवाय ही आकडेवारी खरी मानलीच तर ती उत्पल पर्रीकरांनाही विचार करायला लावणारी ठरू शकते.

कवडी मोलाचे रस्ते

देशातील महागड्या स्थळांपैकी गोवा असल्याने येथील जीवनशैली आणि जमिनी महाग असून, पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात मोठ्या संख्येने लोक गोव्यात येतात, त्यामुळे राज्य विकसित झाल्याचा गजर सरकारकडून चाललेला ऐकू येतो.

जीवनशैली आणि जमिनी महाग असल्या तरी येथील रस्ते, मात्र कवडीमोल झाले असल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. गोवेकर आणि पर्यटकांना या रस्त्यांवरून फिरण्याची पाळी आल्याने हाच का विकसित गोवा?. वाहून गेलेले रस्ते कधी सुधारणार की नाही, असा प्रश्‍न लोकांना पडलेला दिसतो.

‘नरकासुर’च्या नावाखाली धिंगाणा

राज्यात दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमा प्रदर्शनाच्या ठिकाणी कर्णकर्कश आवाज व मद्यधुंद होऊन संगीताच्या तालावर नाचणारे हौशी तरुण म्हणजे ती रात्र काहींना मजेची असते, मात्र त्या परिसरात राहणाऱ्यांना कानठळ्या बसवणारी असते. नरकासुर प्रतिमा करणाऱ्यांना आमदार व मंत्र्यांकडून पैशांची मदत मिळते म्हणूनच त्याचा गैरवापर ओल्या पार्ट्यांसाठी होत असतो.

काही ठिकाणी पहाटेपर्यंत ओल्या पार्ट्या सुरू असतात. पोलिसांकडूनही कारवाईबाबत गंभीर दखल घेतली जात नाही. रस्त्यावरील गर्दी व वाहतूक कोंडी यामुळे पोलिस कारवाईसाठी तेथेपर्यंत पोहचू शकत नाहीत. वाहतुकीवर नियंत्रण की, कर्णकर्कश आवाजावर देखरेख ठेवायची, अशा द्विधा स्थितीत सापडून पोलिसही हैराण होतात. ही रात्र म्हणजे पोलिसांची तारेवरची कसरत असते.

Khari Kujbuj
खरी कुजबुज: दादांना पडू लागलीत आमदारकीची स्‍वप्‍ने

पैसे देणारे-घेणारे गुन्हेगारच!

राज्यात सध्या सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो रुपये घेणाऱ्या ठकसेन पूजा नाईक हिच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, कधी काळी तिला आशीर्वाद असलेल्या काही आजी-माजी आमदार व मंत्री यांचेही धाबे दणाणले आहेत. तिने सध्या दोन सरकारी अधिकाऱ्यांकडून सरकारी नोकऱ्या मिळवण्यात झालेल्या मदतीसंदर्भात पुसटशी माहिती दिली आहे. तोच धागा पकडून पोलिस पुढील तपास सावधगिरीने करत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पोलिस अधिकाऱ्यांवरही दडपण आहे.

पूजा नाईक हिने जरी सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो रुपये घेतले असले तरी ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनीही स्वतःहून तिच्याशी संपर्क साधून ते स्वखुशीने पैसे दिले आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देणारे व घेणारे हे दोन्ही दोषी ठरतात. ज्यांनी पैसे देऊन नोकऱ्या मिळवल्या आहेत, ते चूप आहेत. तर ज्यांची कामे झाली नाहीत व दिलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याने ते तक्रारी करू लागले आहेत. त्यामुळे पूजा नाईक ही गुन्हेगार आहेच मात्र, तिला पैसे देऊन विश्‍वास ठेवून तिला प्रोत्साहन देणारे तेवढेच जबाबदार नाहीत का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com