
पणजी: पप्पा पूर्वीपासून पक्षाचे काम करत होते. त्यामुळे त्याच विचारांत आपली जडणघडण झाली. वाजपेयी यांची भाषणे ऐकून प्रेरणा मिळत असे. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी अनेक ठिकाणच्या भाजप सभांना उपस्थित राहत असे. अत्यंत प्रेरणादायी असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यांची ‘हार नही मानूंगा’ ही कविता आजही हृदयात आहे,असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
मुख्यमंत्र्यांनी ती कविताही म्हणून दाखवली.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हृदयात गोव्याचे वेगळे स्थान होते. आजही राज्यभरात विखुरलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात अटलजींचे अढळ असे स्थान आहे. याचा प्रत्यय आज इन्सिस्ट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या अटल स्मृती संमेलनात आला.
पक्षात आज फारसे सक्रीय नसलेले अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी पणजीत आले होते. मंचावरही भाजपने त्या काळातील नेते-कार्यकर्त्यांना आवर्जून स्थान दिले होते. त्यात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार दिगंबर कामत, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, कुंदा चोडणकर, गोविंद पर्वतकर, संजीव देसाई, सुभाष साळकर, मनोहर आडपईकर, नारायण कारेकर, रामराव देसाई, रामचंद्र बखले आणि त्या काळात अटलजींशी संवाद साधणाऱ्या पत्रकार सुहासिनी प्रभुगावकर यांचा समावेश होता.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अटलजींनी निर्माण केलेल्या वारशाचा आवर्जून उल्लेख केला. भाजपच्या आजवरच्या वाटचालीत योगदान दिलेले काशिनाथ परब, दादा आर्लेकर, गणबा दुभाषी, सदानंद शेट तानावडे, दत्ता खोलकर, सतीश धोंड, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, सुरेश आमोणकर यांच्याविषयीही ते भरभरून बोलले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही उपस्थित होते. मंचावर एकेक जण अटलजींच्या आठवणी सांगत होता आणि अनेकांचे डोळे पाणावत होते, असे हृद्य वातावरण कार्यक्रमस्थळी होते. कोणी काय भाषणे केली यापेक्षा त्यांचा हृदयसंवाद किती थेट होता हे आजच्या कार्यक्रमावेळी दिसून आले.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते. भाजपमध्ये नसतानाही वाजपेयींसोबतच्या भाजप प्रवासाचे साक्षीदार असलेल्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला त्यांना पहिल्या रांगेत आर्वजून स्थान देण्यात आले होते. त्यांचा शाल, गौरवचिन्ह देऊन यावेळी सन्मानही करण्यात आला.
अटलजींचा सहवास लाभलेल्या ६० जणांना यावेळी गौरविण्यात आले. यात कृष्णी वाळके, वैदेही नाईक, गौरी कामत, राजसिंह राणे, राजेंद्र गानू, भाई पंडित, हनुमंत वारंग आदींचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.