पणजी: राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) गोवा फॉरवर्ड (Goa Forward) काँग्रेसशी (Congress) युती करून लढवणार आहे. या युतीला काँग्रेस दिल्ली हायकमांडची मान्यता मिळाली असल्याची माहिती गोव्याचे काँग्रेस प्रभारी गुंडू राव यांनी दिली आहे. उद्या बुधवारपासून (28 जुलै) सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात गोवा फॉरवर्ड व काँग्रेस एकत्रितपणे विविध विषयांवरून सरकारला कोंडीत घेरणार असल्याचे तसेच कामकाजाचे दिवस कमी करून भाजप सरकारने लोकशाहीची हत्त्या केल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे विधीमंडळ गटनेते तथा अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी केला. (Assembly Election: Goa Forward party will form an alliance with Congress)
गोवा भेटीवर आलेल्या काँग्रेसचे प्रभारी गुंडू राव यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा झाली होती. काँग्रेसकडूनही हिरवा कंदील दाखवला आहे. गोवा फॉरवर्डतर्फे 40 पैकी 12 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असून त्यासंदर्भातचा सर्वे सुरू आहे. अजून या युतीनुसार कार्यपद्धतीबाबत चर्चा व्हायची आहे असे आमदार सरदेसाई म्हणाले.
अर्थसंकल्प अधिवेशनावेळी कामकाजाचे दिवस कमी
करून पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे सरकारने मान्य केले होते मात्र विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हे अधिवेशन आता तीन दिवसांवर आणले आहे. प्रश्न मांडण्यास किती संधी मिळेल हे माहीत नाही मात्र विरोधकांची आज संध्याकाळी एकत्रित बैठक होणार आहे त्यामध्ये विविध मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा तसेच विविध घोटाळ्यांचा पर्दाफाश करू असे ते म्हणाले.
विधानसभा अधिवेशन कामकाज दिवस कमी करून त्याला कमी महत्त्व देण्याचे सरकारने रचलेले षडयंत्र हे आगामी निवडणुकीमध्ये गोवा फॉरवर्डचा मुद्दा असेल. गोवा म्हादई, मायनिंग व मनी या ‘थ्री एम्स’ समस्येमधून जात आहे. या तिन्ही मुद्यांवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याव्यतिरिक्त राज्यातील पूरस्थिती व कोविड गैरव्यवस्थापन तसेच ढासळलेली कायदा व सुव्यवस्था हे प्रश्नही विधानसभेत उपस्थित केले जाणार आहेत. जर हे प्रश्न विधानसभेत मांडण्यास संधी न मिळाल्यास ते जनतेच्या कोर्टात नेले जातील असे आमदार सरदेसाई म्हणाले.
दिल्लीतील चर्च पाडल्याबद्दल निषेध व्यक्त करत प्रतिक्रिया देताना आमदार सरदेसाई म्हणाले की, कोणतीही धार्मिक वास्तू ही पाडली जाऊ नये तर ती इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात यावी असे माझे मत आहे. भाजप व आम आदमी पक्ष हे लोकशाही विरोधात आहेत व या घटनेममागे ते दोघेही गुंतलेले आहेत. अल्पसंख्याकाबाबत या दोन्ही पक्ष वचनबद्धतेत कमी पडले आहेत अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील सरकारी कार्यक्रम तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात आले तेव्हा कोविड - 19 चे नियम लागू होत नाही का? राज्यातील गावे पुरामुळे पाण्याखाली गेली असताना तसेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना त्यांच्या आगमनासाठी ढोल बडवण्यात आले अशी सडकून टीका करत आमदार सरदेसाई म्हणाले, कोविडच्या नावाखाली अधिवेशनचे कामकाज कमी दिवसांचे का? जर शक्य नसल्यास ऑनलाईन अधिवेशन सत्र घ्या अशी मागणी त्यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.