पणजी: राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांच्या दिल्ली दौऱ्यात गोव्यासंदर्भातील (Goa) निवडणूक (Election) अहवाल सादर केल्यानंतर काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी गांधीनगर गाठले. विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तोंडावर तेथे भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीची चमक दाखवली आहे. आणि आज सकाळी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणपतीचे आशीर्वादही घेतले.
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यात प्रमोद सावंत यांना मंचावर स्थान देण्यात आले. त्यांच्यापासून फुटभर अंतरावर राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष तर मंचाच्या दुसऱ्या बाजूला अमित शहा होते. या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री औपचारिकपणे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली.
राज्यपाल पिल्लई गेले दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्याला सदिच्छा दौरा असे त्यांनी नाव दिले असले तरी पंतप्रधानांनी त्यांच्याकडून गोव्यातील राजकीय सद्यस्थिती जाणून घेतली. विशेषतः अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाविषयी त्यांची निरीक्षणेही मांडली. एरव्ही कोविड नियमावलीनुसार पंतप्रधान आलेल्या पाहुण्यांशी दूरवर बसून चर्चा करतात. मात्र पिल्लई यांच्यापासून दोनेक फुटावर बसून पंतप्रधानांनी गहन चर्चा केली. यातून त्यांंना राजकीय चित्र बरेचसे स्पष्ट झाल्याचे मानले जाते. राज्यपालांचा राजकीय अहवाल हा महत्त्वाचा असल्याने पुढील राजकारण त्यावर बेतलेले असेल असे दिसते. राज्यपालांनी दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची घेतलेली भेटही भुवया उंचावणारी ठरली आहे. दरम्यान, राज्यपाल गोव्यात येण्यापूर्वी मिझोरामचे राज्यपाल होते.
"गांधीनगरमध्ये आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट झाली. इतर विषयांसोबत विधानसभा निवडणुकीचीही चर्चा केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजप चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे."
- दर्शना जरदोश, निवडणूक सहप्रभारी
"गांधीनगरमध्ये भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहता आले. त्यांच्या भावी वाटचालीस यश चिंतितो. शपथविधी सोहळ्यानिमित्त वरिष्ठ नेत्यांची भेट झाली."
- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
या साऱ्या भेटीत निवडणूक राज्य सह प्रभारी, रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची घेतलेली भेट लक्षणीय ठरली. या भेटीत थेटपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा झाली. भाजपमधील सध्याची स्थिती पुढे काय होऊ शकते, राजकीय शक्यता इतर बरेच काही चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांची गुजरात दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची बैठक निवडणूक प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झाली.
या बैठकीत निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतानाच निवडणुकीला सामोरे जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचाही अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विविध समाज घटक, भाजप बहुल भाग, पक्षांतर्गत अति महत्त्वाकांक्षी नेते, इतर पक्षातून आलेले 14 आमदार आदी विषय या चर्चेत आल्याची माहिती मिळाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.