
म्हापसा: हणजूण पंचायतक्षेत्रात नुकतेच आमदार मायकल लोबो व दिलायला यांच्या उपस्थितीत, येथील रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु आसगावचे रस्ते २५ मीटरचे नकोत, असे म्हणत ग्रामस्थांनी विरोध केला.
परंतु, या कामाला कुठलीच शासकीय परवानगी नव्हती, असा दावा करत आज आसगावातील काही जागृत लोकांनी एकत्रित येऊन या प्रकाराला विरोध केला. लोबो दाम्पत्याने लोकांची बांधकामे जेसीबीद्वारे पाडून रस्ता रुंदीकरणाचा घाट घातला आहे. ही दादागिरी असून आसगावचे रस्ते २५ मीटर रुंद नकोत, असे म्हणत ग्रामस्थांनी वज्रमूठ आवळली.
हणजूणमधील स्थिती भविष्यात आसगाव पंचायत क्षेत्रात उद्भवू नये, यासाठी आसगावमधील जागृत स्थानिकांनी या रस्ता रुंदीकरणारच्या बेकायदा प्रकाराविरुद्ध न्यायालयात जाण्याचा विचार योजिला आहे. आम्हाला आसगाव पंचायत क्षेत्रात २५ मीटर रस्ते नकोत. जे विद्यमान रस्ते आहेत, ते आम्हासाठी पुरेसे आहेत. हणजूणमधील ज्यांची बांधकामे पाडली, त्यांना या मोहिमेचा भाग बनवून घेण्यासाठी संबंधितांना विश्वासात घेतले जाईल, असा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.
सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे म्हणाले की, कळंगुटच्या आमदारांनी हणजूणमध्ये गेल्या ११ मे रोजी, रस्ता रुंदीकरणाच्या नावाने केलेला प्रकार दादागिरीचा होता. जे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले, त्याला सरकारी मान्यता वा परवानगी नव्हती. याबाबत आम्ही आमदारांकडे परवानगी (वर्क ऑर्डर) दाखवावी, अशी मागणी तेव्हा केली. परंतु, संबंधितांकडे लेखी काहीच नव्हते. यावेळी लोकांच्या संरक्षक भिंती पाडल्या, मात्र त्यातील काहींना विश्वासातच घेतले नाही. भविष्यात हा प्रकार घडल्यास, आम्ही कायदा हातात घेऊ, असे पोलिस निरीक्षकांना सांगितले जाईल.
स्थानिक अर्विन फोन्सेका म्हणाले की, यापूर्वी लोबोंनी शिवोलीत असेच परस्पर मोठ्या झाडांची कत्तल करून रस्ते रुंद केले होते. आताही तिच युक्ती ते हणजूणात वापरू पाहताहेत. मुळात ते बिल्डर लॉबीला खूश करू पाहताहेत. या प्रकाराबाबात न्यायालयात दाद मागावीच लागेल. बलभीम मालवणकर म्हणाले की, आम्हाला गावातील रस्ते २५ मीटरचे रस्ते नकोत. जे आहेत,ते पुरेशे आहेत.
येत्या २५ मे रोजी, आसगाव पंचायतीची ग्रामसभा आहे. यावेळी हणजूणमधील प्रकाराबाबत निषेध नोंदवून, गावातील रस्ते २५ मीटर नको, असा ठराव मांडला जाईल. तसेच रस्ता रुंदीकरणाच्या समर्थनार्थ जे बोलत आहेत, त्यांची इंचही जमीन गेलेली नाही. मुळात जे रुंदीकरण होत आहे, ते सार्वजनिक रस्त्याचे आहे. तो खासगी रस्ता नाही. लोकप्रतिनिधींनी स्वतःला कायद्यापेक्षा वरचढ समजू नये, असे म्हणत उपस्थितांनी लोबोंनी रस्ता रुंदीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचा आजच्या बैठकीत निषेध केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.