
पणजी: गेल्यावर्षी जून महिन्यात भरपावसात गाजलेल्या आसगाव येथील एकमजली प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोडप्रकरणी क्राईम ब्रँचने सुमारे ६०० पानी आरोपपत्र म्हापसा न्यायालयात दाखल केले आहे.
याप्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्शद ख्वाजा याच्यासह १३ संशयित तसेच ३० साक्षीदारांचा समावेश आहे. मात्र या प्रकरणाला कारणीभूत ठरलेल्या व पोलिसांनीच मास्टमाईंड म्हणून न्यायालयात तिचा अटकपूर्व जामीन फेटाळताना बाजू मांडलेल्या दिल्लीतील पूजा शर्मा यांच्याविरुद्ध कोणतेच ठोस पुरावे नसल्याचे नमूद करून तिला आरोपपत्रातून क्लिन चीट दिली आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अर्शद ख्वाजा (दोनापावल), अश्फाक कादर शेख (वास्को), अझिम कादर शेख (वास्को), महम्मद इम्रान सलमानी (कुठ्ठाळ्ळी), बिसमिल्ला गोरगुंडगी (नेरूल), शॉलोन कल्लप्पा मोरेकर (कांदोळी),
शाहिन जाफर सौदागर (कांदोळी), रोहित किसन बोबटे (केपे), जावेद शेख इस्माईल शेख (मडगाव), झहीद इमाम मुल्ला (धारबांदोडा), प्रचलेश प्रमोद नाईक (सत्तरी), महम्मद हनिफ हजरत साब शेख (फोंडा) व रुबिना अब्दुल्लासन शेख (महाराष्ट्र) याचा समावेश आहे.
या सर्वांविरुद्ध भादंसंच्या कलम ३६५, ४२७, १४३, १४७, ३५२, ३५४, ४४०, ४४७, ४४८, ४५२, १२० बी खाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आसगाव येथील सर्वे क्र. १३५/१ए या जमिनीत आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा काही भाग सूत्रधार ख्वाजा याच्या सांगण्यावरून जेसीबी व बाऊन्सरच्या संरक्षणात पाडण्यात आला होता.
या घटनेवेळी आगरवाडेकर पिता-पुत्राचे अपहरण झाल्याने हणजूण पोलिसांनी पूजा शर्मा व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तत्कालिन पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांनी तपासकामात हयगय केल्याचा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
पूजा शर्मा ही एका आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याने तत्कालीन पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी या घराच्या मोडतोड प्रकरणाला पाठिंबा दिला होता. मात्र सरकारी पातळीवर याप्रकरणाची मुख्य सचिवांमार्फत झालेल्या चौकशीवेळी महासंचालकांचा हस्तक्षेप सिद्ध झाल्याने त्यांची दिल्लीत पाठवणी करण्यात आली होती. हे आसगाव प्रकरण त्यानंतर हणजूण पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले होते.
पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर हे या प्रकरणाचा तपास करत होते. पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने तो मंजूर केला होता. जेव्हा घटना घडली, तेव्हा ती आसगाव येथे नव्हती, त्यामुळे तिचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पुरावाच समोर आला नाही. मुख्य सूत्रधार अर्शद ख्वाजा याने जेसीबी व बाऊन्सर्स आणून घर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी प्रदीप राणा, काही बाऊन्सर्स याना अटक केली होती. तपासादरम्यान प्रदीप राणा याचा मृत्यू झाल्याने त्याच्यासह अकबर ख्वाजा यालाही आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.