Artist in Goa : मला स्वतःला संगीतात पुष्कळ रस आहे आणि मी वेळ मिळेल तेव्हा राज्यातील विविध संगीत सभांना माझी उपस्थिती लावतो. विशेषतः कला अकादमीत होणाऱ्या संगीत सभांना माझी हमखास उपस्थिती असते. अशा सभांना बहुतेक वेळा माझी गाठ एका मध्यमवर्गीय सद्गृहस्थांशी पडायची. हे गृहस्थ संगीत ऐकताना आपल्या मांडीवर आपल्या हातांनी ताल धरताना दिसायचे. वारंवार होणाऱ्या भेटींमुळे बऱ्यापैकी तोंडओळख झाली व एक दिवस धीर करून मी त्या गृहस्थांना माझी ओळख करून दिली. त्यांच्याबद्दल माहिती विचारल्यावर त्यांनी त्यांचे नाव सदाशिव (राजेंद्र) नाईक प्रतापराव सरदेसाई असे सांगितले. मित्र मंडळीत व आप्तेष्टांत ‘दादा’ म्हणून ते परिचित होते. जरा खोलात जाऊन चौकशी केल्यावर ते सीबीआय व मुंबई कोर्टाचे गोवास्थित ‘पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून कार्यरत असल्याचे समजले. 2008 साली या सद्गृहस्थाचे निधन झाल्याची वार्ता वर्तमानपत्रातून समजली व अतीव दुःख झाले.
2010 साली माझ्या चुलत बहिणीचे लग्न पार पडले. त्यावर्षी गणेशचतुर्थीनिमित्त कुंभारजुव्याला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. तिथे त्यांचा फोटो बघून मला कला अकादमीत भेटणारे सद््गृहस्थ हे माझ्या मेहुण्याचे वडील असल्याचे समजले. याबाबत त्याला छेडले असता, त्याने त्याच्या वडिलांबद्दल भरभरून बोलताना त्यांनी जोपासलेल्या एका जगावेगळ्या अशा छंदाबद्दल कथन केले. हा छंद म्हणजे विविध प्रकारचे तबले, डग्गे व पखवाज यांची जमवाजमव करण्याचे वेड. माझ्या मेहुण्याच्या वडिलांना अगदी लहानपणापासून संगीताची आवड. विशेषतः तबला व तत्सम वाद्ये वाजवण्याकडे जास्त कल. लहान वयातच त्यांनी अनेक शास्त्रीय गायक वादकांना तबलासाथ केल्याचे मेहुण्याने मोठ्या अभिमानाचे सांगितले. त्यांचा हा छंद जगावेगळा असे संबोधण्याचं कारण म्हणजे त्यांची लहानपणापासूनची संगीताची आवड व आस्था ही त्यांना या अतिशय वेगळ्या अशा छंदात परिवर्तित करण्यास कारणीभूत ठरली.
संगीतामध्ये साथ करताना ‘तबला’ या वाद्याच्या बरोबरीने ‘डग्गा’ हे वाद्य वाजवले जाते. सर्वसाधारणपणे तबला हा उजव्या हाताने व डग्गा हा डाव्या हाताने वाजवला जातो. (डावखुऱ्या वादकांचा अपवाद) त्यामुळे तबल्याला ‘दांया’ व डग्ग्याला ‘बांया’ असे संबोधले जाते. या सद्गृहस्थांनी आपला छंद जोपासताना केवळ तबल्याची व डग्ग्याचीच नाही, तर ही वाद्ये बनवताना जे साहित्य वापरले जाते, त्यांचीही जमवाजमव करण्याचा ध्यास घेतला. मला त्यांची वाद्ये ठेवण्याची खोली दाखवली असता तिथे विविध प्रकार व आकाराचे जवळजवळ 50 तबले, 7 डग्गे व 3 पखवाज व्यवस्थित मांडून ठेवल्याचे पाहावयास मिळाले.
तबला हे वाद्य झाडाच्या खोडापासून बनवले जाते. त्यामुळे ही खोडं जमवताना त्यांच्यामध्ये काही उणिवा (भेगा वगैरे) नाहीत ना याची खातरजमा करावी लागते. बहुतेकवेळा सागवान, शिसम किंवा काहीर या प्रकारचे लाकूड वापरले जाते. या वाद्यातून उमटणारा नाद हा त्या लाकडाच्या गुणधर्मावर आधारित असतो व त्यामुळे वेगवेगळे ध्वनी उमटण्यास मदत होते. त्यांच्या या वेडापायी ते अनेकवेळा त्या कारखान्याला स्वतः भेट द्यायचे, जिथे हे कारागीर विविध झाडांची खोडं कोरून तबले बनवायचा व्यवसाय करायचे. तिथे जाऊन ते त्यांना तबल्याची उंची, रुंदी व खोली किती असावी, म्हणजे चांगला व उच्चप्रतीचा तबला बनेल, याबद्दल माहिती द्यायचे. डग्गा हे वाद्य साधारणतः एखाद्या धातूपासून बनवले जाते. त्यांनी जमवलेल्या डग्ग्यामध्ये तांब्याचे डग्गे जास्त आहेत. कारण हा धातू सर्वांत महाग व उच्चप्रतीचे डग्गे बनवायला मदत करतो.
अन्य धातूंचा, विशेषतः पितळ व स्टीलचा वापरसुद्धा होऊ शकतो. आता तबला व डग्गा एखाद्या मैफलीत वापरण्याजोगा बनवण्यासाठी विविध गोष्टींचा वापर अनिवार्य असतो. यात वरच्या भागावर (तोंडावर) चामड्याचे गोलाकार कातडे (ज्याला ‘पुडी’ असे संबोधतात) व ज्यावर मध्यभागी विशिष्ट प्रकारच्या पावडरपासून बनवलेला लेप लावला जातो, ज्याला ‘शाई’ असे संबोधतात. वरच्या पुडीला छिद्रे पाडून त्यातून चामड्याच्या पट्ट्याखालच्या भागापर्यंत ओढल्या जातात. या पट्ट्यांच्या व तबल्याच्या बाजूच्या भागामध्ये लांबट गोलाकार लाकडाचे तुकडे (ज्यांना ‘गठ्ठे’ असे संबोधतात) बसवतात. ज्यामुळे तबला सुरांत मिसळता येतो. याशिवाय शाई पॉलिश करण्यासाठी विविध प्रकारचे व आकाराचे गोटे, तबला व डग्गा सुरांत लावण्यासाठी वापरले जाणारे विविध धातूचे (तांबे, पितळ किंवा स्टील) हातोडे, या सर्व साहित्याचे संकलन त्यांच्याकडे जतन करण्यात आले आहे.
कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या चौकस बुद्धीनुसार त्यांनी शाई तयार करून ते पुडीवर लावायचे तंत्र प्रख्यात तबला कारागीर बुगडे गुरुजी यांच्याकडून प्रत्यक्ष हजेरी लावून शिकून घेतले होते. त्याचप्रमाणे आपल्या तबल्यांची चांगली देखभाल व्हावी म्हणून ते स्वतः सुताराकडून लाकडाची प्रत जोखायचे व त्यावर योग्य प्रकारचे पॉलिश व कीटकनाशक लेपून वाळवीला दूर ठेवायचे. त्यांच्या 50 तबल्यांच्या ताफ्यांत काळी 1 (टिपेचा तबला) ते काळी 5 (धाला) पर्यंतच्या तबल्यांचा समावेश होता. ‘धाला’ या तबल्याचा आकार एखाद्या मोठ्या बरणीसारखा असल्याने एकदा त्यांच्या आजीने त्यात मीठ साठवल्याची आठवणसुद्धा समोर आली. त्यांच्याकडे विविध तबल्यांचे असे संकलन होते की 10-15 तबले एका गोलाकार रेषेत मांडून त्यावर तबला-तरंगसहज बनवता येऊ शकेल.
एकदा माडये गुरुजींना त्यांचे तबला संकलनाचे कौतुक करताना, ‘जर तबला नवाझ श्री झाकीर हुसेनने हे बघितलं, तर त्यांना निश्चितच अचंबा वाटेल’, असे विधान केले होते. शेवटी सांगायचे झाले, तर त्यांचा तबला जमवण्याचा वेडा छंद हा केवळ संगीताबद्दलच्या आस्थेखातर होता. त्यात कसलाही आर्थिक कमाईचा किंवा बाजारीकरणाचा लवलेशही नव्हता. अशा या संगीतवेड्या अवलियाचा हा जगावेगळा छंद आपणासमोर यावा, यासाठीच हा लेखप्रपंच.
-डॉ. राजीव कामत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.