Vishwas Bhandare : भारतीय सैन्यात गोव्याची मान उंचावणारे लेफ्टनंट कर्नल विश्वास भंडारे

1965 साली कच्छच्या रणामध्ये ते युद्धभूमीवर लढले, तेव्हा ते एक तरुण लेफ्टनंट होते. त्याच वर्षी एप्रिलपासून पाकिस्तानने या भागात आपले पाय पसरायला सुरुवात केली होती.
Vishwas Bhandare | Indian Army
Vishwas Bhandare | Indian ArmyDainik Gomantak
Published on
Updated on

Vishwas Bhandare : लेफ्टनंट कर्नल विश्वास केशव भंडारे (निवृत्त) यांचा जन्म 1942 साली पणजीच्या जुन्या सचिवालयाजवळील प्राचीन, ऐतिहासिक म्हामाई कामत वाड्यात झाला. व्यावसायिक क्षेत्रात त्याकाळी गोव्यात आघाडीवर असलेले म्हामाई कामत हे त्यांचे मातुल घराणे. त्यांचा व्यापार आंतरराष्ट्रीय असल्याने त्यांच्याजवळ जहाजांचा ताफाही होता. त्यांचे वडील कुंभारजुवा येथे प्रसिद्ध वैद्य होते. पुढे ते सांताक्रूझ, कालापूर येथे स्थायिक झाले. डॉक्टर केशव भंडारे यांनी सांताक्रूझ येथे मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. पणजी लिसियममध्ये त्यांनी गणित शिकवले. गोव्यातील एक उत्कृष्ट डॉक्टर असलेल्या केशव भंडारे यांच्यासाठी त्यांचा पेशा हे पैसे कमावण्याचे साधन नव्हते. ते चांगले व योग्य उपचार करत आणि रुग्ण जेवढे देत तेवढेच पैसे घेत. क्वचितप्रसंगी घेतही नसत. त्यांनी कुणाजवळही फीची मागणी केली नाही. रुग्णाने जे काही दिले ते स्वीकारले.

आपल्या मुलाने आपल्याप्रमाणेच शिकून लोकांची सेवा करावी, असे डॉ. भंडारे यांना कायम वाटे. परंतु, लहानग्या विश्वासचे पाय वर्गापेक्षाही जास्त फुटबॉल मैदानावर स्थिरावत. ज्याने शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न पाहिले तो मुलगा मैदानावर फुटबॉलची फायनल मॅच खेळतोय, हे पाहून किती दु:ख झाले असेल. खास करून, त्यावेळी जेव्हा त्या सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. विश्वासने तो सामना आपल्या कौशल्याच्या जोरावर जिंकला. इतर खेळाडूंसह आपल्या मुलाच्या हाती चषक देताना पित्याला एक वेगळीच जाणीव झाली. विश्वास हा अतिशय प्रतिभावंत फुटबॉलपटू असल्याचे तेथील धर्मगुरुंनी सांगितले, तेव्हा त्यांची खात्री पटली.

विश्वासनेही वडिलांचे म्हणणे मान्य करीत फुटबॉल व शिक्षण या दोन्ही गोष्टींत प्रावीण्य मिळवले. पणजीतील प्रॉग्रेसमधून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विश्वासने 1958 साली बेळगाव येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतला. येथेही अभ्यास आणि क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवली. अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल आणि फुटबॉलमध्ये त्यांनी कर्नाटक विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.

केवळ आंतरमहाविद्यालयीनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये रशिया व इतर देशांविरोधात खेळण्याचीही संधी त्यांना लाभली. इंटर सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत झाली. ही निवड झाली तेव्हा ते विज्ञान शाखेतील पदवी परीक्षेचा अभ्यास करत होते.

मांडवी नदीतील जलतरण स्पर्धेदरम्यान असे काही घडले की, त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. एका तीरावरून पोहत सर्व जवान दुसऱ्या तीरावर पोहोचले तेव्हा लक्षात आले की, त्यांच्यापैकी एका जवानाने पैलतीर गाठलेच नव्हते. विश्वास यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मांडवीत पुन्हा सूर मारला. दहा मिनिटे शोध घेतल्यावर त्यांना त्यांच्या साथीदाराचा मृतदेह सापडला. साश्रू नयनांनी त्यांनी तो तीरावर आणला.

1964 साली त्यांना लगेच पॅराशूट रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या 50 (स्वतंत्र) पॅरा ब्रिगेडच्या 2 पॅरा बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. लेफ्टनंट कर्नल भंडारे यांनी आपल्या आयुष्याची 18 वर्षे 2 पॅरासोबत घालवली.

क्रीडा प्रकारातील साहसाचा अनुभव त्यांनी अनेक उपक्रमांत घेतला. साहसी मोहिमांमध्ये ते कायम स्वत:हून भाग घेत. लेहमधी सर्वांत उंच ठिकाणी टी-7, टी-10 सारख्या नवीन पॅराशूटचे परीक्षण करण्यासाठी कनिष्ठ असूनही त्यांची निवड करण्यात आली होती. उप-गटाच्या कमांडसाठी निवडले गेलेले ते सर्वांत लहान अधिकारी होते. लष्करातील त्यांचे बहुतांश जीवन युद्धभूमीवरच गेले. आयुष्यात शांतपणे बसून राहणे, थांबणे त्यांना कधी मानवलेच नाही. त्यांच्या सेवाकाळाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची नियुक्ती गोव्यात झाली, तेवढा काळ काय तो, ते युद्धभूमीपासून व साहसी उपक्रमांपासून दूर राहिले.

1965 साली कच्छच्या रणामध्ये ते युद्धभूमीवर लढले, तेव्हा ते एक तरुण लेफ्टनंट होते. त्याच वर्षी एप्रिलपासून पाकिस्तानने या भागात आपले पाय पसरायला सुरुवात केली होती. 1947 प्रमाणेच, 5 ऑगस्ट 1965 रोजी पाकिस्तानने सुमारे 15,000 प्रशिक्षित आणि सशस्त्र रझाकार, 7,000 मुजाहिद वेशातील सैनिक यांच्या मदतीने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. भारताने 1 सप्टेंबर 1965 रोजी युद्ध घोषित केले. 15 इन्फंट्री डिव्हिजनचा भाग असलेल्या 50 ब्रिगेडकडे लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध आघाडी उघडण्याचे काम सोपवले होते. त्यावेळी, लष्करी सेवेत सक्रिय होऊन भंडारे यांना उणेपुरे दीड वर्षच झाले होते. माउंट एव्हरेस्ट सर केलेले तीन अधिकारी असलेल्या त्यांच्या बटालिअनमध्ये भंडारे सर्वांत लहान व तरुण होते. त्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे कार्यवाहक कॅप्टन म्हणून त्यांची पदोन्नती झाली आणि दक्षिण भारतीय जवानांचा समावेश असलेल्या युनिटच्या बी (ब्राव्हो) कंपनीची कमान त्यांच्याकडे सोपवण्यात आली. 14 आणि 15 सप्टेंबर 1965 रोजी शत्रूची तैनाती, सामर्थ्य, पुढील चाल आणि शस्त्रास्त्रे यांचा माग काढण्यासाठी पाकिस्तानी सीमेच्या आत तीन ते चार किमी अंतरावर रात्रीच्या वेळी फक्त तीन माणसांसह पाठवण्यात आले. हे चौघे पाकिस्तानी हद्दीत घुसल्याचा सुगावा पाक सैनिकांना लागला. तरीही शिताफीने आपली सुटका करून घेतली. इतकेच नव्हे तर मोठी मशीनगन लादलेली एक मानवरहित पाकिस्तानी टँक पळवून आणली. आजही ती मशीनगन 2 पॅरा क्वार्टर गार्ड रूमसमोर आपण पाहू शकतो. आग्रा येथील 2 पॅरा ऑफिसर्स मेसमध्ये बोर्डवर योग्यरीत्या बसवलेला आणि ’2’ चिन्हांकित केलेला ब्राऊनिंग 50 मिमी बेल्ट आजही त्यांची शौर्यगाथा सर्वांना सांगत आहे.

Vishwas Bhandare | Indian Army
Goa Liberation Movement : गोवा मुक्ती लढ्यात गोमंतक प्रजा मंडळाची भूमिका किती महत्त्वाची?

15 सप्टेंबर 1965 रोजी रात्री दुसऱ्या ठिकाणी पाक क्षेत्राचे सर्वेक्षण करताना, त्यांनी आणि गटाने पाक सैनिकांवर दगडफेक केली. पाक सैनिकांना गोळीबार करायला प्रवृत्त केले आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्याचा अंदाज घेऊन ती माहिती तळावर दिली. या इनपुटमुळे उच्च कमांडला हल्ल्याची योजना तयार करण्यास मदत झाली.

16 व 17 सप्टेंबर 1965 च्या रात्री, जीटी रोड (लाहोर) अक्षावर डोगराजवळ इछोगिल कालव्यावरील जल्लो ब्रिजवर मुख्य हल्ला करणाऱ्या बटालियन, 3 जाटला संरक्षण देण्यासाठी, डोगराईच्या पश्चिमेकडून हल्ला करण्याचे आदेश त्यांच्या गटाला देण्यात आले. बटालियन सी कॉयच्या जवानांनी ‘शिवाजी महाराज की जय’, असे म्हणत एका बाजूने हल्ला चढवला, तर ब्राव्हो कॉयच्या दक्षिण भारतीय जवानांनी ‘स्वामी ये अयप्पा’च्या घोष करत दुसऱ्या बाजूने हल्ला चढवला. शत्रूच्या प्रत्येक खंदकावर आणि बंकरवर हल्ला करत त्यांच्याशी युद्ध केले.

लपून बसलेल्या तीन सैनिकांनी नकली खंदकातून उडी मारली आणि तरुण अधिकाऱ्यावर अचानक हल्ला केला. त्यांची संख्या निश्चित माहीत नव्हती. ते जास्तही असण्याची शक्यता होती. कॅप्टन भंडारेंनी त्यांच्यापैकी दोघांना संपवले, तर तिसरा (16 बलुचचा नाईक मुनावर) त्यांच्या पाया पडून शरण आला. मुनावरला युद्धबंदी म्हणून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपल्या सैन्याचा ठावठिकाणा तर सांगितलाच, वरून भंडारेंनी दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाचेही संपूर्ण वर्णन केले.

युनिटचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रामसिंग यादव (हे पुढे जाऊन हरियाणाचे परिवहन मंत्री झाले) यांनी भरणे यांची वीरचक्रासाठी शिफारस केली. पण, अंतर्गत दिरंगाईमुळे त्यांना वीरचक्र कधीच मिळाले नाही. या घटनेचा आणि भंडारेंच्या पराक्रमाचा उल्लेख परवल यांनी रेजिमेंट पॅराट्रूपर्सच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये केला आहे. भंडारेंना वीरचक्र मिळाले नाही याचे दु:ख त्यांच्या इतर सहकाऱ्यांना झाले. पण, त्यांना कधीच झाले नाही. त्यांच्या मते, ‘सैनिकाच्या शरीरावरील जखमा, हीच त्याच्यासाठी सर्वांत मोठे पुरस्कार असतात.’

युद्ध सुरू असताना शत्रूसैन्याने प्रचंड गोळीबार केला. त्याच्या बटालियनच्या चार्ली कंपनीतील सावंतवाडीचे कमांडर मेजर बळीराम परब हुतात्मा झाले. बटालियनलाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. शिफारस होऊनही वीरचक्र मिळाले नाही. त्यांची बटालियन गोळीबारातून सहीसलामत बाहेर पडण्यामध्ये भंडारेंचा सिंहाचा वाटा होता. ते लढले. भारत-पाकिस्तान युद्धात जोरदार गोळीबारामुळे अडकून पडलेल्या आपल्या सहकाऱ्यांना एकल फाईल (रॅमरॉड पद्धतीने) कूच करण्याचे आदेश देऊन त्यांचे प्राण वाचवले.

लेफ्टनंट कर्नल (नंतर ब्रिगेडियर) डेसमंड ई. हेड, एमव्हीसी यांच्या नेतृत्वाखालील बटालियनने मुख्य हल्ला हल्ला केला. त्यांच्या गटात 3 जाट होते. या सर्वांनी एका बाजूने व मागील बाजूने हल्ला केला. भारतीय लष्करी इतिहासातील सर्वांत कठीण लढायांपैकी ही एक आहे. कुठलेच शस्त्र वापरायचे ठेवले नव्हते. बंदूका, ग्रेनेडसह, संगीन आणि हात. भारतीय सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारतीय सैन्य लाहोरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्प्यात, खूप जवळ पोहोत्चले होते.

ही कारवाई इतकी महत्त्वपूर्ण व यशस्वी होती याची कल्पना या एकाच कारवाईने युनिटला मिळालेल्या 3 एमव्हीसी, 4 वीरचक्र आणि 7 एसएम मिळाले आहेत. पण, एवढ्या सफल कारवाईनंतर व लाहोर ताब्यात घेणे शक्य असतानाही माघार घेण्याचे आदेश देण्यात आले, याचे आश्चर्य भंडारेंना आजही वाटते. लाहोर घ्यायचे नव्हते, तरी एकवेळ चालले असते. पण, जिथेपर्यंत पोहोचलो होतो ती जागा कायम ठेवायला हवी होती. रणांगणात जिंकलेले युद्ध टेबलवर हरल्याची यातना लेफ्टनंट कर्नल भंडारे यांना आजही स्वस्थ झोपू देत नाही.

1971 च्या युद्धाआधी ते आग्रा येथे रेजिमेंटच्या तळावर होते. अनेक महिने परिश्रम करून त्यांनी युनिटचे आरव्ही ड्रिल (उंच ठिकाणी हवेतून उड्या (एअरड्रॉप) टाकल्यानंतर गटातील सर्वांना कमीत कमी वेळात एकत्र आणणे) एका युनिटला साधारण अर्धा तास लागतो. 2 पॅरा बटालियनला 11 डिसेंबर 1971 रोजी पूर्वेकडील टांगेल (ढाक्काच्या सर्वांत जवळ असलेला पॉइंट) येथे एअरड्रॉप करण्यात आले.

1982 साली लेफ्टनंट कर्नलच्या पदोन्नती मंजूर झालेले ते सर्वांत कमी सेवाकाळ असलेले अधिकारी होते (त्या दिवसांत त्या रँकवर जाण्यासाठी किमान 18 वर्षांची सेवा केलेली असणे अनिवार्य होते). पण, त्यांच्या युनिटमध्ये प्रमोशन पूर्ण होण्यासाठी त्यांना चार-पाच वर्षे वाट पाहावी लागली.

त्यानंतर चीनच्या सीमेवर सिक्कीममध्ये तैनात असलेल्या 6 बटालियन बिहारची त्यांनी निवड केली. त्याचे ते कमांडर होते. डोकलाममध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. डोकलाममधील संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांनी केलेल्या शिफारशी लागू केल्या असत्या तर 2018 आणि 2019 मध्ये डोकलाम समस्येने आपले डोके इतके वर काढले नसते. चीनने तसे धाडसच केले नसते.

डोकलाममध्ये बटालियनचे कमान सांभाळत असताना, लेफ्टनंट कर्नल भंडारे यांना 1984 साली एका गंभीर हवाई अपघाताला सामोरे जावे लागले. ओटीपोटाला झालेली दुखापत, इतर अनेक तुटलेली हाडे यांच्यासह त्यांना नऊ महिने रुग्णालयात विश्रांती घ्यावी लागली. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुंबईत विशेष ऑर्थोपेडिक काळजी घेण्यासाठी त्यांना नेण्यात आले. निवृत्तीनंतरही त्यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरूच होत्या. (खरे तर शेवटची शस्त्रक्रिया जानेवारी 2021 साली झाली होती.) तुटलेल्या हाडांना सांधण्यासाठी ज्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या ते लेफ्टनंट कर्नल भंडारे हे पणजीतील अस्थिरोग तज्ज्ञ, शल्यविशारद डॉ. दीप भंडारे यांचे चुलत भाऊ आहेत.

निडर कर्नल भंडारे, 1987 पर्यंत त्यांच्या युनिटचे कमांडवर राहिले. 1988 साली ते 11 कॉर्प्समध्ये कर्नल एमएस म्हणून नियुक्त झाले. नंतर कर्नल एमए ते वेस्टर्न कमांडमध्ये आर्मी कमांडरपर्यंत त्यांची पदोन्नती झाली. त्यानंतर ते 1 महाराष्ट्र बीएन एनसीसीमध्ये दाखल झाले व पुढे पणजी येथील स्टेशन मुख्यालयात स्टाफ ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले. येथे असताना त्यांना चार वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आणि शेवटी 1998 साली गोव्यातच ते सेवानिवृत्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com