Shooting At Vasco: झुआरीनगर येथे मध्‍यरात्री थरार; चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार

एक जखमी : दुचाकीवरून पोबारा; घातलाय धुमाकूळ
Firing At Vasco
Firing At VascoDainik Gomantak

झुआरीनगर-वास्को येथील एमईएस महाविद्यालय परिसरात मध्यरात्री दोनच्‍या सुमारास एका बंगल्यात झालेला चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. त्‍यानंतर तीन चोरट्यांनी पळून जात असताना पोलिसांवर गोळीबार केला. त्‍यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.

दरम्‍यान, त्या तिन्‍ही चोरट्यांनी गेल्‍या तीन दिवसांत चोऱ्या करून अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. काल रात्री चोरीसाठी वापलेली दुचाकी मायणा-कुडतरी येथून कालच चोरली होती. तर, लोटली येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून या चोरट्यांनी पलायन केले होते. शिवाय काल रविवारी संध्याकाळी साडेसहाच्‍या सुमारास माटवे-दाबोळी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली होती.

Firing At Vasco
National Education Policy : फाऊंडेशन पातळीवर नवे शैक्षणिक धोरण : शिक्षण सचिवांची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, मध्‍यरात्री बंगल्‍यात चोरटे घुसत असल्‍याची चाहूल शेजारच्‍या लोकांना लागताच त्‍यांनी लगेच वास्को पोलिसांना माहिती दिली. त्‍यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्‍याचे कळताच चोरटे घाबरले आणि त्‍यांनी तेथून पळ काढला.

मात्र पळून जाताना त्‍यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. या घटनेमुळे झुआरीनगर परिसरातील लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वास्को व वेर्णा पोलिसांकडून चोरट्यांचा कसून तपास सुरू आहे.

सदर बंगला डॉ. आमोणकर नामक व्यक्तीचा असून, हे कुटुंब युकेमध्ये स्थायिक आहे. तीन वर्षांपूर्वीही याच बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला होता. त्‍यावेळीही त्यांच्या हाती काही लागले नव्हते. त्यावेळी पोलिस तक्रार करण्यात आली होती.

मात्र चोरटे हाती लागले नव्हते. यावेळी बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वीच चोरट्यांचा डाव फसला. बंगल्याच्‍या मुख्य दरवाजाचे लॉक तोडण्याचे काम सुरू असतानाच शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तेथे पोलिस दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी कुऱ्हाड, स्पॅनर, स्क्रू ड्रायव्हर आणि फोडलेली कुलुपे सापडली.

पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी त्वरित नाकाबंदी केली.

ही बाब लक्षात येताच चोरट्यांनी दोन किलोमीटरवर दुचाकी रस्त्यावरच टाकून पोबारा केला. पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली आहे. या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी त्‍यांचा कसून शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावर श्वानपथक आणि ठसेतज्‍ज्ञांना बोलवून तपास करून पुरावे गोळा केले. अधिक तपास सुरू आहे.

Firing At Vasco
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी 'पदयात्रा' काढावी; काँग्रेसचा सल्ला

पोलिसांनी गाडी दूर थांबवून केली स्‍वारी

माहिती मिळताच रात्रपाळीवर रोबोटवर ड्युटी करत असलेले पोलीस उपनिरीक्षक स्‍वप्‍निल नाईक यांनी पोलिस कॉन्स्टेबल यशवंत देसाई व प्रल्हाद नाईक यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली.

त्‍यांनी आपली गाडी बंगल्यापासून सातशे मीटर लांब ठेवून तेथून चालत जाणे पसंत केले. डॉ. आमोणकर यांच्या बंगल्याजवळ पोचले असता दोघे चोरटे दरवाजा फोडण्याच्या प्रयत्नात होते तर एक चोरटा बाहेरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बंगल्याबाहेर उभा होता.

पोलिसांना पाहताच त्‍याने आपल्‍या त्‍या दोघा साथीदार चोरट्यांना कळविले. ते बंगल्याच्या कुंपणावरून बाहेर उडी मारून दुचाकीने पळण्याचा प्रयत्नात होते. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्‍हा त्‍यातील एकाने पोलिसांवर गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी स्‍वप्‍निल नाईक यांच्या डोक्‍यावरून गेली.

पळून जाताना झाडली गोळी

बाहेर उभ्या असलेल्या चोरट्याच्‍या दुचाकीवरून त्यांनी पळ काढला. यावेळी मुख्य रस्‍त्‍यावर एमईएस जंक्शनवर पाळत ठेवून उभे असलेले कॉन्स्टेबल प्रल्हाद नाईक यांनी भरवेगाने दुचाकी येत असल्याचे पाहिले व त्यांनी आपल्याकडे असलेला दंडुका दाखवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकी चालवत असलेल्या चालकाने पाठीमागे बसलेल्या त्याच्या साथीदाराला ‘‘उसको गोली मार’’ असे हिंदीतून सांगितले.

त्यानुसार त्यांच्यावर चोरट्याने गोळी झाडली. ही गोळी जमिनीवर आपटून कॉन्स्टेबल प्रल्हाद नाईक यांच्या गुडघ्याला लागल्याने त्‍यांना किरकोळ जखमी झाली. ते दोघे चोरटे मग भर वेगाने दुचाकीवरून पळून गेले. तिसरा चोरटा बंगल्याजवळ असलेल्या झाडीतून पळून गेला. तोही पोलिसांच्या हाती लागला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com