Arambol Beach: हरमल येथील किनारी भागात नववर्ष स्वागताची धूम चालली आहे. व्यावसायिक गेल्या दोन वर्षांच्या कोविड स्थितीतून पूर्णपणे सावरले असल्याने नफ्यासाठी नवनवे फंडे आजमावत आहेत. व्यावसायिक थेट आता पाण्यात टेबले मांडून ग्राहकांना आपल्याकडे खेचत आहेत,
मात्र जीवरक्षकांच्या ‘दृष्टी’ ची जीप किनाऱ्यांवरील टेबलांमधून वाट शोधत असल्याचे दिसून येत आहे. या स्थितीमुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान तालुक्यातील किनारी भागांतील अतिक्रमणे पर्यटन खात्याने जप्त केल्याचे समाधान पर्यटकांत होते,मात्र नववर्षातही ‘दृष्टी’च्या जीपला नीटशी वाट मिळू नये,याचे आश्चर्य वाटल्याचे एका पर्यटकाने सांगितले.
पर्यटन विभागाचे पोलिस तैनात नसल्याने पर्यटकांत नाराजी पसरली आहे.एखाद्यावेळी त्यांना संपर्क केल्यास पोलिस अन्य कामात व्यग्र तर कधी इस्पितळात जबानी घ्यायला गेलेत,असा संदेश मिळतो. घटनास्थळी पोचण्यास तास- दीड तासाचा उशीर होत असल्याने लोकही संतापतात,असे पॉल यांनी सांगितले.
पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत हे कार्यक्षम गणले जातात. बंदोबस्त व अन्य सुविधाबाबत निर्णय घेताना,किनारी भागांतील पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची मानून सेवा देतील, अशी अपेक्षा व्यावसायिक व नागरिक बाळगून आहेत.
अपुऱ्या पोलिस संख्येमुळे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक हतबल होणे स्वाभाविक आहे. मोरजी,मांद्रे,हरमल व केरी या चारही समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते, तिथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सज्ज असले तरी कुमक पुरेशी का नसते,असा सवाल स्थानिक रहिवाशांनी केला.
‘दृष्टी’च्या जीपलाही जर किनाऱ्यावर फिरण्यासाठी वाव मिळत नसेल तर काय करावे. एखादी दुर्घटना घडल्यास जीवरक्षकांनी पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी जीप पाण्यापर्यंत नेऊन तेथून पर्यटकाला इस्पितळात कसे न्यावे,असा प्रश्न या वाढत्या अतिक्रमणामुळे सर्वांनाच पडतो. - पर्यटक पॉल,रशिया
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.