पणजी: सांतिनेझ चर्चची जमीन विकसकाला विक्री प्रकरणात माझा हात असल्याचा आपच्या उमेदवार सिसिल रॉड्रिग्ज यांनी केलेला आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा अन्यथा त्यांनी 24 तासांत जाहीर माफी मागावी. तसे न केल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा ताळगावचे काँग्रेसचे उमेदवार टोनी रॉड्रिग्ज यांनी केला. ताळगावच्या आपच्या उमेदवार सिसिल रॉड्रिग्ज यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर सांतिनेझ चर्चच्या ताळगाव येथील जमिनीच्या विक्रीत
टोनी रॉड्रिग्ज यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना टोनी रॉड्रिग्ज यांनी स्पष्टीकरण करताना सांगितले की, या जमिनीची विक्री1992 मध्ये त्या समितीचे अध्यक्ष इजिदोर फर्नांडिस हे असताना झाली होती. त्यावेळी मी या समितीत साधा सदस्यही नव्हतो. 2004 साली या समितीचा अध्यक्ष झालो. त्यामुळे सिसिल रॉड्रिग्ज यांनी आरोप करण्यापूर्वी त्याची पडताळणी करायला हवी होती व त्यासंदर्भातचे पुरावे असायला हवे होते.
निवडणुकीत मते मिळवण्यासाठी त्यांनी लोकांची दिशाभूल तसेच बदनामी करण्यासाठी हे खोटे आरोप केले आहेत. त्यांनी या चर्चच्या समितीकडे किंवा फादरकडे चौकशी करायला हवी होती. कोणाच्या तरी सांगण्यावरून हे आरोप केले आहेत. त्यांनी हे केलेले आरोप सिद्ध करावेत अन्यथा सर्व ताळगाववासीयांची जाहीर माफी मागावी, असे रॉड्रिग्ज म्हणाले.
या पत्रकार परिषदेला टोनी रॉड्रिग्ज यांच्या प्रचाराला पाठिंबा दिलेले नगरसेवक उदय मडकईकर, रेजिना आल्मेदा तसेच बॉस्को मिनेझिस उपस्थित होते.
‘सिसिल यांची भाजप उमेदवाराशी हातमिळवणी’ : नगरसेवक मडकईकर म्हणाले, आपच्या उमेदवार सिसिल रॉड्रिग्ज यांनी टोनी रॉड्रिग्ज यांना बदनाम करणारी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्याला भाजपशी जवळीक असलेल्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यावर सकारात्मक कॉमेंटस् घातले आहेत. हे कॉमेंटस् सिसिल यांना पाठिंबा देणारे आहेत. यावरून सिसिल यांनी भाजपच्या उमेदवाराशी हातमिळवणी केली आहे. सध्या ताळगावात काँग्रेसचे उमेदवार टोनी रॉड्रिग्ज हे विजयी होणार असल्याने भाजप उमेदवाराच्या पायाखालची जमीन घसरत चालली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.