

मडगाव/म्हापसा: हणजूण येथे ‘लेट नाईट पार्टी’मध्ये सहभागी झालेल्या इशान बडगुजर (२१) या इंदूरच्या युवकाचा मृत्यू ‘ड्रग्स कॉकटेल’मुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
इशानच्या शरीरात मद्यासोबत एकूण पाच प्रकारच्या अमली पदार्थांचे अवशेष सापडल्याचे ‘रेन्डॉक्स’ चाचणीतून स्पष्ट झाले आहे. ३ एप्रिलला इशान हा मित्रांसह हणजूण येथे एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेला होता.
पार्टी आटोपून सर्व मित्र बाहेर पडले असता, इशानची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे तातडीने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याला मृत जाहीर करण्यात आले. हा मृत्यू ड्रग्स ओव्हरडोसमुळेच झाला असावा, असा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.
शरीरात काय आढळले?
मृत इशानच्या शरीरात एम्फेटामाईन, मेटाफेटामाईन, एमडीएमए, टेट्राहायड्रो कॅनोबिनॉल आणि कोकेन या अमली पदार्थांचे अंश सापडले. मृत्यू पश्चात उत्तरीय तपासणीही करण्यात आली होती. त्यात त्याच्या फुफ्फुसांना आणि मेंदूला मोठी सूज आल्याचे आढळले होते. वैद्यकीय परिभाषेत त्याला ‘इडेमा’ असे म्हटले जाते. ड्रग्सच्या ‘ओव्हरडोस’मुळे रक्तवाहिन्यांद्वारे अंमली पदार्थ द्रवरूपात फुफ्फुसात आणि मेंदूत जाऊन त्या अवयवांना सूज येते.
काही प्रश्न अनुत्तरित, तपास होणार का?
ईशानचा मृत्यू ड्रग्ज कॉकटेलने झाल्याचे उघड झाल्याने पोलिस संबंधितांवर कोणती कारवाई करणार?
ड्रग्ज कोठून आणले होते, याचा तपास केला जाणार का?
इशानसोबत आलेल्या मित्रांची चौकशी होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पर्यटनासाठी २ एप्रिलला गोव्यात आलेल्या नऊ मित्रांच्या सहलीचा अंत एका भीषण शोकांतिकेत झाला आहे. इंदूर, मध्यप्रदेश येथील एका नामांकित महाविद्यालयात ''बीबीए''च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या ईशान सिंग बडगुजर हा क्रमिक अभ्यासात हुषार होता.
तीन एप्रिल रोजी रात्री उशिरा ते सारे वागातोर येथील ‘रईथ’नामक रेस्टॉरंट-क्लबमध्ये गेला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ईशान व त्याचा मित्रपरिवार वारंवार अशा सहलींचे आयोजन करत असे. त्यांनी थायलंडची सहलही केली होती.
गोवा हे बाहेरून येणाऱ्या युवा पर्यटकांसाठी एक ‘ड्रग्स डेस्टीनेशन’ बनले आहे, यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वीही गोव्यात आलेल्या पर्यटकांचे अशा तऱ्हेने मृत्यू झाले आहेत. उत्तर गोव्यात असे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झालेले असून, गोव्यात सहजपणे ‘सिंथेटिक ड्रग्स’ उपलब्ध होते, ही गोष्टदेखील त्यामुळे उघडकीस आली आहे. - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.