
हणजूण: हणजूण किनाऱ्याचे नैसर्गिक स्वरूप नष्ट करून खासगी मालमत्ता विकसित करत असल्याच्या आरोपांवर कळंगुटचे आमदार आणि मंत्री मायकल लोबो यांनी रेव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीचे (RGP) अध्यक्ष मनोज परब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार पलटवार केला आहे. लोबो यांनी 'आरजी'वर पर्यावरणाऐवजी केवळ राजकारण करण्याचा आरोप केला आहे.
मायकल लोबो यांनी स्पष्ट केले की, हे काम सर्व नियमांचे पालन करून केले जात आहे. "आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही संरक्षक भिंत बांधत आहोत आणि यासाठी स्वतः पैसे भरत आहोत," असे त्यांनी सांगितले. जलस्रोत विभागाने संपूर्ण किनाऱ्यावर अशा भिंती बांधल्या आहेत, त्यामुळे एका गोमंतकीय व्यक्तीने काही बांधले तर लोकांना आनंद व्हायला हवा.
लोबो यांनी मनोज परब यांच्यावर थेट आरोप करत म्हटले की, जर एखादा बाहेरील व्यक्ती बांधकाम करत असेल, तर 'आरजी' 'सेटिंग' करून पैसे घेते आणि काम पुढे चालू देते. ते पुढे असेही म्हणाले की "मनोज परब केवळ स्वतःला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत." लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानंतर त्यांना लोक आता खोटारडे म्हणून ओळखतात. त्यांचे खरे लक्ष गोव्याला वाचवणे नसून, 'गोव्याला लुटणे' आहे.
लोबो यांनी 'आरजी'च्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जर 'आरजी'ला खरोखरच गोव्याची काळजी असती, तर त्यांनी शापोरा ते मोरजी आणि हरमल येथील अनेक मोठे प्रकल्प का थांबवले नाहीत? लोबो यांनी दावा केला की, त्यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन काम थांबवले आहे, पण 'आरजी'ने त्या ठिकाणी 'सेटिंग' करून पैसे घेतले आणि काम चालू दिले.
मायकल लोबो यांनी मनोज परब यांच्यावर वैयक्तिक टीका करताना म्हटले की, परब खऱ्या मुद्द्यांकडे लक्ष देत नाहीत. "जेव्हा कोणी मोठे बांधकाम करते, तेव्हा तो आक्षेप घेत नाही, कारण त्याने आधीच 'सेटिंग' केले आहे. लोबो म्हणाले, "मी निवडणुकीनंतर कधीच लपून बसत नाही; लोक मला पद सोडायला सांगतील, तर मी व्यवसायात परत जाईन, पण त्यांच्यासारखा निवडणुकीनंतर 'हिबरनेशन'मध्ये जाणार नाही."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.