Ammonia Tank: जेटी येथील मुरगाव बंदर क्षेत्रामध्ये असलेली अमोनिया टाकी म्हणजे जीवंत ‘टाईम बॉम्ब’ आहे. त्यामुळे सरकारने याठिकाणी त्वरित मॉक ड्रिल करावे, अशी मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे.
तसेच यासंबंधीची कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी संबंधित प्रशासनाला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. तसे न झाल्यास बंदरातून होणारी अमोनियाची वाहतूक थांबवण्याचा इशारा दिला आहे.
आमदार आमोणकर बायणा येथे श्री खाप्रेश्वर देवस्थानच्या वर्धापन दिन कार्यक्रमास आले असता, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले की, जेटी येथील अमोनिया टाकीचे संबंधित प्रशासनाने मॉक ड्रिल व टाकीच्या सुरक्षेसंबंधी संयुक्त तपासणी करण्याची गरज आहे.
मात्र, याची दखल घेतलेली नाही. मुरगाव बंदरात अमोनिया टाकी असल्याने तेथे सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाहीत.
त्या टाकीसंबंधी नियमित मॉक ड्रिल झाल्याचे आम्ही ऐकलेले नाही. ज्याप्रमाणे शहरी भागातील इंधन साठवणुकीच्या टाक्या दुसरीकडे स्थलांतरित केल्या, त्याप्रमाणे अमोनिया टाकीही हलवावी, असे आमोणकर म्हणाले.
वाहतुकीवेळी नियम धाब्यावर
द्रव रूपातील अमोनियाची टँकरद्वारे रस्तामार्गे झुआरीमध्ये वाहतूक केली जाते. त्यावेळी टँकरच्या मागे एस्कॉर्ट व अग्निशमन दल असावे लागते.
हा नियम पाळण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. या टाकीच्या आसपास दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे कदाचित आपत्ती घडली, तर ती मुरगाव मतदारसंघालाच नव्हे, तर इतर परिसरालाही त्रासदायक ठरेल, अशी भीतीही आमोणकर यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.