साखळी: 2025 पर्यंत गोवा राज्य हे स्टार्ट अपचे विश्वकेंद्र बनवणार आहोत. त्याकरिता 500 नाविन्यपूर्ण स्टार्ट अप सुरू करण्यात येतील. याद्वारे गोव्यामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. संपूर्ण देशाचे गोव्याकडे लक्ष असेल. त्यामुळे गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपला बावीस प्लस पुर्ण बहुमत द्या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यातील मतदारांना साखळी येथील जाहीर सभेत केले.
साखळी येथील बोडके मैदानावर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी आयोजित सभेत त्यांनी भाजपचे धोरण स्पष्ट केले. व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते. शहा म्हणाले, ही निवडणूक (Goa Election 2022) गोवा स्थापना 50 वर्षा व देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना होत आहे. गेल्या पाच वर्षांत गोव्यात स्थिरता व विकास लाभला. येत्या पाच वर्षात गोवा समृद्ध बनवणार.
गोवा हे गांधी परिवारासाठी पर्यटन स्थळ
गोवा देशासाठीही महत्वपुर्ण आहे. कारण देशाचा विकास राज्याच्या विकासावर विसंबून असतो. गोवा ही भारत माताच्या कपाळावरील कुंकू आहे. या ठिकाणी वेगळ्या प्रकारची संस्कृती बघायला मिळते. गोवा देशभरात विकासात क्रमांक एक वर आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना भाजपने यशस्वीपणे राबविल्यात. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, गोवा हे गांधी परिवारासाठी पर्यटन स्थळ आहे. ते पर्यटक म्हणून गोव्यात येतात. काँग्रेस म्हणजे अस्थिरता व अराजकता. भाजप म्हणजे स्थिरता व विकास असे शहा यांनी सांगितले. मगोपच्या सुदीन ढवळीकर यांच्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी सभेत टीका केली.
''ढवळीकर हे स्वत: आपल्या मतदारसंघात निवडून येत नसल्याने इतर भागात जाऊन ढवळाढवळ करीत आहेत. तृणमूल बरोबर अभद्र युती मगोपला या निवडणूकीत बुडवणार आहे. सभेचे सूत्रसंचालन सिद्धी पोरोब व आभार कालिदास गावस यांनी मानले.
मुख्यमंत्री भावूक
भाषणात मुख्यमंत्री सावंत हे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीने भावूक झाले. 2012 व 2017 साली पर्रीकर माझ्या विजयासाठी साखळीत आले होते. आज ते हयात नाहीत. कार्यकर्त्यांमुळेच मी आमदार, सभापती व मुख्यमंत्री बनलो असे म्हणत सावंतांनी नतमस्तक होऊन आभार मानले. तसेच अमित शहा यांनाही त्यांनी वाकून नमस्कार केला.
मुख्यमंत्र्यांनाही निवडून आणायचे आहे!
सभेत अमित शहा यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे भरभरून कौतूक केले. साखळीतील लोकांना केवळ आमदारच नव्हे तर मुख्यमंत्रीही निवडून आणायचा आहे. भाजपचे बावीस प्लस पुर्ण बहुमत द्या. सावंत मुख्यमंत्री बनल्यानंतर सहा महिन्यात गोव्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात येतील असे जाहीर आश्वासन शहा यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.