सासष्टी: सनबर्नच्या आयोजनावरुन गोव्यात वादाला तोंड फुटले असताना आता दक्षिण गोव्यातील एका गावाने सनबर्न आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत ठराव मंजूर करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने वृत्तपत्रात या ग्रामसभेची माहिती प्रसिद्ध केलीय. पण, या आयोजनासाठी ग्रामपंचायतीवर राज्यातील मंत्र्याचा दबाव असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
सासष्टी तालुक्यातील लोटली ग्रामपंचायतीच्या वतीने सनबर्न आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत इंग्रजी वृत्तपत्रात माहिती देणारी नोटीस प्रसिद्ध केलीय. येत्या ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता पंचायतीच्या हॉलमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोटली येथील वेर्णा पठारावर सनबर्न महोत्सव आयोजित करण्यात यावा, लोटलीत कचरा हाताळणी प्रकल्प उभारण्यात यावा आणि रोमी कोकणीला अधिकृत आणि समान दर्जा देण्यात यावा, असे तीन ठराव या ग्रामसभेच्या अजेंड्यावर आहेत. पंचायतीचे सरपंच सनफ्रान्सिस्को फर्नांडिस यांच्या वतीने ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विशेष ग्रामसभेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यास अर्धा तास प्रतिक्षा केल्यानंतर ठरलेले कामकाज नियोजनाप्रमाणे सुरु राहिलं, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
सनबर्न आयोजनासाठी लोटली ग्रामपंचायतीवर सावंत सरकारमधील मंत्र्याचा दबाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
देवाचा आणि लोकांच्या जनादेशाचा विश्वासघात करणारे आलेक्स सिक्वेरा आता आपल्या राजकीय दबावाचा वापर करून वेर्णा पठारावर सनबर्न फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी लोटली ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.
लोटलीच्या सरपंचांनी त्यांच्या दबावाखाली न येता सदर विषय सभेच्या अजेंड्यातून रद्द करावा असे आवाहन, काँग्रेसने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.