उत्तर गोव्यातून विरोध होत असल्यामुळे राज्याला रामराम ठोकलेल्या आणि आता दक्षिण गोव्यात प्रखर विरोधाला सामोरे जावे लागणाऱ्या सनबर्न महोत्सवामुळे गोवा जागतिक सांस्कृतिक नकाशावर आल्याचा शोध सरकारने लावला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्ली येथे नीती आयोगाच्या बैठकीत सादर केलेल्या भाषणात हा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
गोव्याचा प्रसिद्ध कार्निव्हल, सनबर्न महोत्सव, शिमगोत्सव, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असलेला आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव यांमुळे गोवा जागतिक सांस्कृतिक नकाशावर आला आहे. हे महोत्सव केवळ पर्यटकांनाच आकर्षित करत नाहीत, तर स्थानिक कलाकार आणि उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी शासन कटिबद्ध आहे. कृषी उत्पादकता आणि शेतकरी कल्याणावर भर आहे. राज्य सरकारने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. जनजागृती मोहीम राबविली आहे. गोवा राज्याने २ लाख ३१ हजार ८४९ रोपांची लागवड केली आहे. त्याने २४०.५ हेक्टर क्षेत्र व्यापले आहे.
गोव्याला नितांत सुंदर समुद्रकिनारे लाभले आहेत. यावर केवळ पर्यटकच येत नाहीत, तर ऑलिव्ह रिडले कासवही अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे संरक्षण केले जाते आणि या अंड्यांतून बाहेर पडलेली दहा हजार पिल्ले पुन्हा समुद्रात सोडण्यात आली आहेत.
काळाच्या ओघात गोव्याने आपला प्रभाव सर्वदूर पसरवला आहे. सर्वाधिक पसंतीचे आंतरराष्ट्रीय पर्यटक म्हणून जागतिक नकाशावर स्थान पटकावले आहे. राज्यात २०२३-२४ मध्ये ८८.४६ लाख पर्यटक आले. त्यात ४.१४ लाख विदेशी पर्यटक होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीतून वॉकआउट केले. आयोगाची ९ वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात भाजपसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
बैठकीतून बाहेर पडण्याचे कारण सांगताना ममता म्हणाल्या, विरोधी पक्षातून मी फक्त बैठकीला हजेरी लावली होती. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी १० ते २० मिनिटे देण्यात आली होती, तर मला फक्त पाचच मिनिटे मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.