
मडगाव: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’च्या तस्करीसाठी सांगेचीच निवड का करण्यात आली, याचे गूढ अजून कायम आहे. या तस्करीचा मागच्या वर्षी रत्नागिरीत झालेल्या अंबरग्रीस तस्करीशी संबंध तर नाही ना, हा प्रश्न उभा राहिला आहे.
या प्रकरणात शुक्रवारी सांगे पोलिसांनी सावंतवाडी येथील मुख्य संशयित योगेश रेडकर याच्यासह सांकवाळ येेथे राहाणारा रत्नकांत कारापूरकर आणि फोंड्यातील साईनाथ शेट या तिघांना अटक केली होती. या तस्करीसाठी वापरलेल्या दोन गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या प्रकरणात संशयितांना सांगे न्यायालयाने चार दिवसांचा पोलिस कोठडीचा रिमांड दिला होता.
मिळत असलेल्या माहितीनुसार, संशयित रेडकर हा मासळी पुरवठादार असून अशी ‘अंबरग्रीस’ कुठे उपलब्ध आहे का, याची त्याच्याकडे पडताळणी करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी तो सावंतवाडीहून हा माल घेऊन दुचाकीवरून सांगे येथे आला होता. नंतर गोव्यातील अन्य दोन संशयितांनी त्याची भेट घेतली. रेडकर हा माशांच्या व्यवसायात असल्याने त्याचा रत्नागिरी येथील व्यावसायिकांशीही संबंध येत होता. त्यामुळेच या तस्करीचा रत्नागिरी येथे झालेल्या तस्करीशी संबंध असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
मागच्या वर्षी ६ जून रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बावधन येथे सापळा रचून दोघांना अंबरग्रीससह अटक केली होती. त्यातील एक संशयित संदीप शिवराम कासार हा मालगुंड येथे हॉटेल चालवत होता. तर दुसरा संशयित किशोर यशवंत डांगे हा वाहनचालक होता. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचा माल पकडला होता.
सांगे येथे पकडलेला मालही महाराष्ट्रातून आणला गेला आहे. एरव्ही ‘अंबरग्रीस’ काहीशी मऊ असते; पण सांगे येथे पकडलेली ‘अंबरग्रीस’ सुकून खडखडीत झालेली होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांपूर्वी ती पाण्यातून काढली असावी आणि नंतर कुठेतरी साठवून ठेवली असावी, असा तर्क व्यक्त करण्यात येतो.
१.मागच्या वर्षी असाच प्रकार मडगावच्या कोकण रेल्वे पोलिस स्थानकावर उजेडात आला होता. केरळमधून दोन युवक सुमारे ५.६० काेटी रुपयांची देवमाशाची उलटी घेऊन गोव्यात आले होते. अरुण राजन (३६) आणि निबीन वर्गीस (२९) अशी या दोघांची नावे होती.
२.मडगाव रेल्वे स्थानकावरील ‘आरपीएफ’ पाेलिसांनी संशयावरून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे हे घबाड सापडले होते. मात्र, या दोघांना पकडूनही पोलिस अद्यापही या तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचू शकलेले नव्हते, त्यामुळे या नव्या प्रकरणाच्या मुळाशी सांगे पोलिस पोहोचू शकतील का? हा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
यासंदर्भात सांगेचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांना विचारले असता, संशयिताने हा माल नेमका कुठून आणला त्याची माहिती अजून मिळालेली नाही. माल कोणासाठी आणला होता त्याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही. सध्या त्यांच्या चौकशीसाठी चार दिवसांचा रिमांड आम्हाला मिळाला आहे. संशयितांकडून माहिती मिळविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.