फोंडा: फोंडा (Ponda) तालुक्यातील सर्वच मंदिरे (Goa Temple) आता देवदर्शनासाठी खुली करण्यात आली असून, मंगेशी येथील श्री मंगेश देवालय पासून खुले झाले आहे. तालुक्यातील म्हार्दोळ येथील महालसा, कवळे येथील शांतादुर्गा, रामनाथी येथील रामनाथ, नागेशी बांदोडा येथील नागेश, बांदिवडे येथील महालक्ष्मी, बोरी येथील नवदुर्गा, शिरोडा येथील कामाक्षी आणि मडकई येथील नवदुर्गासह इतर अन्य देवालये या आधीच खुली झाली आहेत, मात्र सर्व देवालयात कोविडविषयक नियमांचे पालन करूनच हे देवदर्शन केले जात आहे. फोंडा तालुक्यातील मंदिरे देवदर्शनासाठी खुली झाली असली तरी महत्त्वाचे उत्सव मात्र बंदच आहेत.
मंगेशीतील मंगेश देवस्थान भाविकांना खुले केल्याने पहिल्याच दिवशी स्थानिकांबरोबरच पर्यटकांनीही देवदर्शनासाठी उपस्थिती लावली. गेल्या वर्षीपासून कोविड महामारीमुळे राज्यातील सर्वच देवालये बंद करण्यात आली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात कोविड नियंत्रणात आल्याने देवालये खुली करण्यात आली. त्यानंतर गेल्या मार्चमध्ये पुन्हा एकदा कोविडने उचल खाल्ल्याने देवालये पुन्हा बंद करण्यात आली. नंतरच्या काळात गेल्या जूनमध्ये कोविड महामारी बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याने बहुतांश देवालये देवदर्शनासाठी कडक नियमावली घालूनच खुली करण्यात आली. मात्र मंगेशी येथील मंगेश देवालय खुले करण्यात आले नव्हते.
मंगेश देवालयासह तालुक्यातील इतर सर्व देवालये फार प्रसिद्ध असून, भाविक तसेच देशी विदेशी पर्यटक या मंदिरात देवदर्शनासाठी येतात. मात्र ही देवालये मध्यंतरीच्या काळात बंदच राहिल्याने पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता.
मंदिरे बंद राहिल्याने केवळ मंदिरातील उत्पन्नच घटले असे नव्हे तर मंदिर परिसरात फुलविक्री तसेच देवाचे साहित्य विकणारे विक्रेते, दुकानदार, चहा हॉटेलवाले, थंडपेयवाले या सर्वांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या जूनमध्ये कोविड बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याने आता सगळीकडे देवदर्शनासाठी देवालये खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे फुलविक्री तसेच इतर गाडे व दुकानदारांचे व्यवसाय काही अंशी सुरू झाले आहेत. तेवढाच दिलासा या व्यावसायिकांना मिळाला आहे.
देवदर्शन करण्यासाठी मंदिरे खुली असली, तरी काही मंदिरांत उत्सव मर्यादित स्वरूपात तर काही मंदिरांत उत्सव बंदच करण्यात आले आहेत. कोविडवर पूर्णपणे नियंत्रण आल्यावरच हे उत्सव पुन्हा सुरू होतील, अशी माहिती काही देवस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
अमावास्या उत्सव बंदच
शिरोड्यातील प्रसिद्ध कामाक्षी देवीचा अमावास्या उत्सव अद्याप बंदच आहे. कामाक्षीचे मंदिर कोरोनामुळे गेल्या मार्चमध्ये बंद करण्यात आले होते, मात्र त्यानंतर कोविड नियंत्रणात आल्याने पुन्हा खुले करण्यात आले आहे. कडक नियम घालूनच हे देवदर्शन करण्यास मुभा देण्यात आली आहे. शिरोड्यातील श्री कामाक्षीचा अमावास्या उत्सव केवळ गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरही प्रसिद्ध असून अमावास्येला हजारो भाविक शिरोड्यात कामाक्षीच्या दर्शनासाठी येतात, मात्र महामारीमुळे हा उत्सव सध्या बंद आहे. देवालयातील इतर कार्यक्रम सध्या निर्बंध घालूनच सुरू ठेवण्यात आले आहेत. बोरीतील नवमी उत्सवही निर्बंधित स्वरूपात सुरू आहे.
गेल्या मार्चपासून बंद झाली देवालये
कोविड महामारीचा गेल्या मार्चपासून दुसऱ्यांदा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याने फोंडा तालुक्यातील मोठी देवस्थाने बंद करण्यात आली होती. मात्र, जूननंतर कोविड महामारी बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने काही देवालये कडक नियमावलीनुसार खुली करण्यात आली, तर काही देवालयांत केवळ श्रींचे मुखदर्शन तेवढे खुले ठेवण्यात आले होते. फोंडा तालुक्यातील मंगेश देवालय अद्यापही बंदच होते, मात्र ते आता खुले झाले असून, सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत देवदर्शन करता येणार आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
कोविड महामारीमुळे सर्वच उद्योग-व्यवसायांत मंदी आली आहे. सहा महिन्यानंतर काही अंशी उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत, पण कोरोनाचा धोका कायम असल्याने भाविकांनी देवदर्शनासाठी कोविडविरोधी नियमांचे पालन करावे आणि देवस्थानांना सहकार्य करावे.
- राजेश कवळेकर, सरपंच, कवळे
कोविडमुळे आतापर्यंत अनेकांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे. देवालये बंद राहिल्याने मंदिर परिसरातील व्यवसाय ठप्प झाले. आता मंदिरे खुली झाल्याने हे व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाले आहेत, मात्र भाविकांची संख्या पूर्वीसारखी नाही. त्यामुळे कोविड नियमांचे प्रत्येकाने पालन करावे, हलगर्जीपणा नको.
- राजेश नाईक, सरपंच, बांदोडा
महाप्रसाद बंदच
राज्यातील बहुतांश देवालयात उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोविडमुळे महाप्रसादावर निर्बंध आले असून, फोंडा तालुक्यातील सर्वच देवालयातील उत्सव काळातील महाप्रसाद बंदच आहे. फोंडा तालुक्यातील अनेक मंदिरांत महाप्रसाद होत होता. बोरी येथील साईबाबा मंदिरात दर गुरुवारी महाप्रसाद असायचा, पण हा महाप्रसाद सध्या बंद ठेवण्यात आला आहे. देवदर्शन खुले असून, पालखीही निर्बंधित स्वरूपात सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.