

पणजी: मान्सून काळात देशी पर्यटकांना अधिकाधिक गोव्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न पर्यटन खात्याकडून सुरू असतानाच, एअर इंडिया एअरलाईन्सने गोव्यातील दोन्ही विमानतळांवर येणाऱ्या विमानांच्या फेऱ्यांना मोठी कात्री लावल्यामुळे राज्याच्या पावसाळी पर्यटनाला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विमान इंधनाच्या वाढत्या किंमती, जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली संकटे आणि एअरलाईन्समधील अंतर्गत पुनर्रचनेमुळे एअर इंडियाने जूनच्या वेळापत्रकात मुंबई-दाबोळी मार्गावरील १३ साप्ताहिक फेऱ्या रद्द केल्या आहेत, तर दिल्ली-मोपा मार्गावरील एका सेवेला कात्री लावली आहे. दुसरीकडे, एअर इंडिया एक्सप्रेसने दिल्ली-मोपा दरम्यानच्या साप्ताहिक फेऱ्या २१ वरून १४ वर आणल्या आहेत, तसेच हैदराबाद-गोवा दरम्यानच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णयही रद्द केला आहे.
याचा मोठा परिणाम जूनमध्ये गोव्याला बसणार आहे. दरम्यान, जूनपासून आता निश्चित गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटू शकते. त्यांचा फटका पर्यटनाशी संबधित व्यावसायिकांनाही बसणार आहे.
इंडिगो एअरलाईन्सनेही जूनपासून राज्यातील दाबोळी आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही ठिकाणच्या विमान फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय अगोदरच घेतलेला आहे. या एअरलाईन्सने बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांना गोव्याशी जोडणाऱ्या विमान फेऱ्यांच्या संख्येत घट करण्याचा निर्णय घेतला असल्याने पावसाळी पर्यटनासाठी गोव्यात येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांचा तसेच व्यवसायानिमित्त या राज्यांत ये–जा करणाऱ्या गोमंतकीय व्यावसायिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.