

Congress leader attacks BJP: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि एआयसीसी प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेचा कल पाहता, यावेळेस मतदार भाजपला त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माणिकराव ठाकरे म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्हाला असे प्रकर्षाने जाणवले आहे की, भाजप सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
"डबल इंजिन" सरकारच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी केली जात असून, प्रत्यक्षात लोकांच्या पदरात काहीच पडलेले नाही. आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे जनतेमध्ये मोठा रोष असून, या निवडणुकीत जनता भाजप सरकारला नक्कीच धडा शिकवेल, असे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावरून ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लक्ष्य केले. गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडली असून, यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.
हडफडे येथील अग्नितांडवाचा संदर्भ देत त्यांनी आरोप केला की, भाजप सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी गोव्यात बेकायदेशीर नाईटक्लब चालवण्याची छुपी परवानगी दिली. अशा बेकायदेशीर कृत्यांमुळेच गोव्याची शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे.
जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटेकर यांनी यावेळी आम आदमी पक्ष आणि रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी यांच्यावर सडकून टीका केली. पाटेकर म्हणाले की, "केवळ काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टीच भाजपच्या जनविरोधी धोरणांवर हल्ला करत आहेत.
दुसरीकडे, आरजीपी आणि 'आप' हे भाजपवर टीका करण्याऐवजी फक्त काँग्रेसलाच लक्ष्य करत आहेत." केजरीवाल यांचा 'आप' पक्ष कोठेही प्रचार करताना दिसत नाही, त्यांचा एकमेव अजेंडा विरोधी मतांचे विभाजन करून भाजपला फायदा पोहोचवणे हाच आहे, असा आरोप पाटेकर यांनी केला.
निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टीच्या युतीने अत्यंत सक्षम आणि अभ्यासू उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. माणिकराव ठाकरे यांनी गोव्याच्या जनतेला आवाहन केले की, "जर तुम्हाला गोव्याचा विकास आणि सुरक्षितता हवी असेल, तर आमच्या युतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या." भाजपच्या 'हफ्ताखोरी' आणि 'भ्रष्टाचारी' कारभाराला रोखण्यासाठी ही युतीच एकमेव सक्षम पर्याय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.