Agonda : संपूर्ण गोवा राज्यातून एकमेव आगोंद पंचायतीला हरित आणि स्वच्छ पंचायत हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सरपंच प्रीतल फर्नांडिस व माजी सरपंच फातिमा रॉड्रिग्स या दोघांना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गुरुवार, 15 रोजी शेळेर उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.
देशभरातील पंचायतींमधून गोव्यातील एकमेव आगोंद पंचायतीची या पुरस्काराकरता निवड झाली. महिनाभरापूर्वीच सरपंचपदी निवड झालेल्या प्रीतल फर्नांडिस यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीला जाऊन हा पुरस्कार स्वीकारला होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुंदर आणि शांत समुद्रकिनारा म्हणून यापूर्वी गौरविण्यात आलेल्या या आगोंद पंचायतीने यावेळी घरोघरी गोळा केलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली होती. ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांना या खताचे मोफत वितरण करून कचऱ्यासंबंधी जागृती केली होती. ग्रामस्थांनीही चांगले सहकार्य केले. याची दखल केंद्र सरकारतर्फे घेण्यात आली.
मागच्या वर्षभरात पंचायतीने ओला आणि सुका कचरा व्यवस्थित नियोजन करून गोळा केला. त्यापासून खत तयार करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. आता या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. नुकताच जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या केंद्रीय समितीतर्फे नेवरा येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी हे खत बऱ्यापैकी उपस्थित नागरिकांनी खरेदी केली. त्यामुळे पंचायतीला महसूल मिळाला. या सर्वाची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
- प्रीतल फर्नांडिस, सरपंच, आगोंद
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.