Show of Strength: अंतर्मनातील बंधमुक्ती! महिला कलाकारांच्या प्रभावी कलाकृती; ‘शो ऑफ स्ट्रेंथ’

Show of Strength Goa exhibition: आग्वाद पोर्ट अँड जेल कॉम्प्लेक्समध्ये ‘शो ऑफ स्ट्रेंथ’ हे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात गोव्यातील ३० हून अधिक महिला कलाकारांच्या प्रभावी कलाकृती मांडल्या गेल्या आहेत.
Show of Strength Goa exhibition
Show of Strength Goa exhibitionDainik Gomantak
Published on
Updated on

आग्वाद पोर्ट अँड जेल कॉम्प्लेक्समध्ये ‘शो ऑफ स्ट्रेंथ’ हे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात गोव्यातील ३० हून अधिक महिला कलाकारांच्या प्रभावी कलाकृती मांडल्या गेल्या आहेत. या साऱ्या कलाकृती प्रेक्षकांना एका आकर्षक आणि तल्लीन करणाऱ्या अनुभवाकडे खेचून नेतात. या प्रदर्शनात मांडलेली ‘अनशेकल्ड विथीन’ हे इन्स्टोलेशन त्यातील विशेष अर्थामुळे लक्ष वेधून घेते. ‘द क्रोशे कलेक्टिव्ह- गोवा’ या ग्रूपच्या महिला कलाकारांनी हे इन्स्टोलेशन उभे केले आहे.

ही मांडणी स्वातंत्र्य म्हणजे बंडखोरीचे बाह्य कृत्य नव्हे, तर स्वतःकडे परतण्याचा तो एक आंतरिक मार्ग आहे हेच सांगते. एक मानवी (स्त्री) आकृती विणलेल्या जाळ्यात आणि तिला रोखणाऱ्या व तिच्यावर मर्यादा टाकणाऱ्या साखळ्यांमध्ये जखडून उभी आहे. हे जाळे आणि साखळ्या पितृसत्ता, सामाजिक संस्कार, सांस्कृतिक कथा, वारसाहक्काने मिळालेली भीती, आत्मशंका आणि समाजात आपले स्थान मिळवण्यासाठी स्त्रिया अनेकदा करत असलेल्या मूक करारांचे ओझे दर्शवणारी प्रतीके आहेत.

पण यातील काही साखळ्या आता तुटू लागल्या आहेत. या संयमित आकृतीमधून, एका वेगळ्या आशेच्या आणि सौंदर्याच्या दिशेने एक हात पुढे सरसावतो. ती आकृती अशा एका लहान मुलीकडे पोहोचली आहे, जिच्या आतले मूल मुक्त उभे आहे, तिच्या हातांमधून निर्माण होणाऱ्या क्रोशेच्या फुलांनी आणि फुलपाखरांनी ते नटलेले आहे. ते मूल शक्यता, कल्पनाशक्ती, आशा, सहजप्रवृत्ती आणि निःस्वार्थ आनंद यांचे मूर्तिमंत रूप आहे.

Show of Strength Goa exhibition
पर्यावरण मूल्यांपासून आपण दूर जातोय का? गोव्यातील निसर्गस्नेही जत्रांचे बदलणारे स्वरुप आणि सावधगिरी

लाज, अपेक्षा किंवा प्रदर्शन यांपासून ते पूर्ण अलिप्त आहे. ती स्त्री त्या मुलीमुळे मुक्त होत नाहीये; तर स्वतःच्याच अशा एका अंशाशी पुन्हा जोडून घेऊन ती स्वतःला मुक्त करत आहे. ज्या अंशाला मुक्त कसे राहायचे हे नेहमीच ठाऊक होते आणि या पुनर्जाणिवेमुळे ती आतून बरी होऊ लागली आहे. या कलाकृतीतील फुले आणि फुलपाखरे ही नूतनीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक आहेत.

Show of Strength Goa exhibition
गोव्यातील मराठी साहित्यिकांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वखर्चावर संस्कृती जपली आहे; उपेक्षा, संघर्ष आणि अस्तित्वाची नाजूक लढत

जसजशी ती स्त्री आपल्या अंतर्मनातील बालमनाशी पुन्हा जोडली जाते, तसतसे तिच्या बेड्या, बळाच्या जोरावर नव्हे, तर केवळ स्व-जाणीवेमुळे, गळून पडतात. स्वातंत्र्य ही एक प्रक्रिया बनते- संथ, सजग आणि अत्यंत वैयक्तिक.

ही कलाकृती जणू विचारते, जर स्त्रियांनी वंशपरंपरागत बेड्या वाहणे थांबवले तर काय होईल? आपल्याला कोण बनायचे हे सांगितले जाण्यापूर्वी आपण जी मुलगी होतो, त्या रूपात परत गेल्यावर आपल्यात काय बदलते?

-क्रोशे कलेक्टिव्ह गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com