गोव्यातील मराठी साहित्यिकांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वखर्चावर संस्कृती जपली आहे; उपेक्षा, संघर्ष आणि अस्तित्वाची नाजूक लढत

Goa Opinion: साहित्याला ‘परंपरा’ आहे, पण संधी मिळवण्यासाठी ‘ओळखपरंपरा’ लागते, ही विकृत धारणा गोव्यातील साहित्याला गुदमरवते.
Literature in Goa
Literature in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आमोद कुलकर्णी

गोवा आज पर्यटनाच्या नकाशावर चमकणारा, समुद्रकिनाऱ्यांच्या सौंदर्याने मनाला भुरळ घालणारा प्रदेश. पण या झगमगाटाच्या आड एक वेगळे वास्तव शांतपणे श्वास घेत आहे; गोव्याची मराठी साहित्यपरंपरा. ही परंपरा फक्त साहित्याची नाही; संतसाहित्य, पत्रकारिता, सामाजिक जागृती, शिक्षण, सांस्कृतिक संगम आणि लोकचळवळींचा कणा म्हणून तिने इतिहासात ठसा उमटवला आहे.

तरीही आज तीच परंपरा भाषिक राजकारण, संस्थात्मक उदासीनता, नाममात्र निधी आणि प्रशासकीय दुर्लक्ष यांच्या छायेत धडपडत आहे. उपेक्षेला आता नाव देण्याची गरजच उरली नाही; ही साफसफाईने दिसणारी संस्थात्मक उपेक्षा आहे.

आजही कवी लिहितात, कथा जन्म घेतात, तरुण लेखक नवनवीन प्रयोग करतात; पण या सर्जनशील प्रवाहाला योग्य, पारदर्शक आणि टिकाऊ पाठबळ मिळत नाही. गोवा जिथे साहित्यिक विचारांचा दीपस्तंभ ठरू शकला असता, तिथेच व्यवस्थेचा दृष्टिकोन सतत संशयाने भरलेला दिसतो.

लेखक काय निर्माण करू शकतो? या प्रश्‍नापेक्षा ‘लेखकाला कार्यक्रमात कसे सांभाळावे’? हा प्रश्न अधिक वेळा विचारला जातो; ही वृत्तीच गोव्याच्या साहित्यविश्वाची सर्वात मोठी शोकांतिका ठरते.

कुठलीही कला, प्रतिभा, साहित्य, भाषा किंवा संस्कृती टिकवायची असेल, किंबहुना तिचे संवर्धन करायचे असेल, तर राजाश्रय हा अनिवार्य घटक ठरतो. आज गोव्यातील मराठी साहित्यिकांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वखर्चावर ही संस्कृती जपली आहे.

पण व्यवस्थेने त्यांना मिळणारा योग्य पाठबळ, अनुदान आणि धोरणात्मक आधार अजूनही मिळालेला नाही. या उपेक्षेमुळेच प्रतिभावंत लेखक आणि संशोधक संघर्ष करत आहेत, आणि साहित्य जिवंत राहण्यासाठी केवळ आपल्या श्रमावर अवलंबून आहेत.

इतिहास, लोकसंस्कृती, दस्तऐवजी संपत्ती, भाषिक संगम, शब्दकोश निर्मिती - अनेक क्षेत्रांत अभ्यासक अविरत संशोधन करत आहेत. पण संशोधनासाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती नाही, प्रकल्पनिधीची शक्यता अत्यल्प, ग्रंथालयांची अवस्था दीन, आणि दस्तऐवजांचे संवर्धन अपुरे.

डिजिटल आर्काइव्हची संकल्पना अजूनही थोड्याच जिद्दी व्यक्तींच्या खांद्यावर लोंबत आहे. अशा स्थितीत ज्ञाननिर्मितीचा पाया किती काळ भक्कम राहील? संशोधन करणाऱ्यांवरच व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी टाकली जाते आणि त्याच व्यक्तींना नंतर मान्यता देताना दुर्लक्ष केले जाते,

हा विरोधाभास गोव्याच्या प्रशासकीय दुर्बलतेचे क्रूर चित्रण आहे. डिजिटल उपक्रम, भाषावैज्ञानिक अभ्यास केंद्रे, सांस्कृतिक डेटाबेस यांसारखी कामेही व्यक्तींच्या श्रमांवर टिकून आहेत. योजना जाहीर होतात, पण अंमलबजावणीला गती नसते.

उपक्रम सुरू होतात, पण निधी अर्धवटच मिळतो. धोरणे तयार होतात, पण जबाबदारी कोणाची याचा ठावठिकाणा नसतो. परिणामी एकच प्रश्न सतत छळतो, व्यवस्था पर्यवेक्षक आहे की फक्त प्रेक्षक?

कवी-लेखकांसाठी ‘अनुदान’ हा शब्दच जणू गोव्यात वर्ज्य आहे. पुस्तकनिर्मिती, प्रकाशन, संशोधन, फेलोशिप, वार्षिक ग्रँट-कशासाठीही शासनाने दरवर्षी वाट पाहणाऱ्या साहित्यिकांना केवळ निराशाच मिळते.

मानधन देण्याचा प्रश्न तर लाजिरवाणा. कवी-लेखक स्वतःच्या खिशातून साहित्य जगवतात आणि हीच त्यांची स्वयंपूर्णता व्यवस्थेसाठी त्यांना दुर्लक्षित करण्याचे सोयीस्कर कारण बनते. ज्या भाषेच्या संस्कृतीतून गोवा घडला, त्या भाषेकडेच पाठ फिरवणे हे सांस्कृतिक दारिद्र्याचं चिन्ह नाही तर चेतावणी आहे.

अधिकृत समर्थनाऐवजी साहित्यिक उपक्रम आज व्यक्तींच्या संघर्षामुळे टिकून आहेत. वाचनमंडळे, कविसंमेलने, व्यासपीठे, कार्यशाळा - ही सगळी चळवळ काही समर्पित मंडळींच्या जिद्दीमुळे चालते.

लढणाऱ्यांनाच स्वतःचे खिसे रिकामे करावे लागतात आणि त्याच उपक्रमांवर टीका करणारी मंडळी नंतर मंचावर उभी दिसतात, हादेखील गोव्याच्या साहित्यजगताचा कटू विनोदच.

याउलट सोशल मीडियावर उभी राहिलेली उथळ दिखाऊ ‘साहित्यसंस्कृती’ वेगाने वाढताना दिसते. खऱ्या साहित्यापेक्षा काढलेला ‘फोटो’ लेखकाला प्रसिद्ध करतो; राजकारण्यांसोबतच्या सेल्फ्या, साहित्यिकांसोबतचे फोटो, आणि परस्पर स्तुतीचा बाजार हीच जणू साहित्याची नवीन चलन प्रणाली झाली आहे.

कलाविवेक नसताना केली जाणारी परस्पर स्तुती हीच आजच्या दिखाऊ साहित्याची खरी ओळख ठरते.

याहून मोठी सावली गोव्याच्या साहित्यविश्वावर पडलेली आहे-साहित्यिक चोरीची. जुन्या कविता ‘रिमिक्स’ करणे, इंटरनेटवरील मजकूर जशाच्या तसा घेणे, प्रेरणाच्या नावाखाली नक्कल करणे, या प्रवृत्ती इतक्या प्रमाणात वाढल्या आहेत की मौलिकतेची ओळख हरवू लागली आहे. हे फक्त नैतिकतेचा नाही, तर साहित्याच्या मान-सन्मानाचाही गंभीर अपमान आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी प्रतिभा दारात उभी आहे, पण मंचावर नाही. एक छोटा गट, त्यांची लॉबी, त्यांचे नातेवाईक-यांच्यावरच सतत प्रकाशझोत. खऱ्या गुणवत्तेची ओळख, संधी, नोंद , कशातच या नव्या प्रतिभेसाठी जागा नाही. साहित्याला ‘परंपरा’ आहे, पण संधी मिळवण्यासाठी ‘ओळखपरंपरा’ लागते, ही विकृत धारणा साहित्याला गुदमरवते.

तरीही, या उपेक्षेच्या ढिगाऱ्यात साहित्याचे नाडी-स्पंदन जिवंत आहे. गोव्याचा साहित्यिक आजही थांबलेला नाही. उपेक्षा वाढते तशी त्यांची दृढता अधिक तीव्र होते.

साहित्य जिवंत आहे कारण व्यवस्थेने त्याला जपले म्हणून नाही; तर साहित्यिकांनी स्वतःच्या श्वासाने ते जिवंत ठेवले म्हणून. ही जिद्द, ही चिकाटी यातूनच गोव्याच्या मराठी साहित्याची खरी रीड उभी आहे.

शेवटी, गोव्यातील मराठी साहित्याला फक्त निधी नको; त्याला सांस्कृतिक प्रामाणिकता, न्याय्य धोरणे, राजकीय निष्पक्षता आणि सर्जनशीलतेचा सन्मान हवा आहे. जोपर्यंत गुणवत्तेला प्राधान्य, संशोधनाला स्थायी निधी, साहित्यकृतींना अनुदान, आणि नव्या प्रतिभेला संधी देण्याची रचना तयार होत नाही तोपर्यंत साहित्य तग धरेल, परंतु तेजस्वी प्रकाशाने उजळणार नाही. साहित्याचा आवाज दाबता येतो, पण नष्ट होत नाही. आणि एक दिवस हा आवाज इतका घनगंभीर होईल की उपेक्षेचा संपूर्ण अंधार मागे सरकून जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com