
पणजी: राज्यातील वनक्षेत्र कमी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार आहेत, असा आरोप करणाऱ्या अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता गौरव बक्शी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बक्शी यांनी एका व्हिडिओद्वारे गोव्यातील वनक्षेत्र कशाप्रकारे कमी झाले व मुख्यमंत्री सावंत यांनी जमीन माफियांना कसा अभय दिला यावर भाष्य केले आहे.
गौरव बक्शीवर गुन्हा नोंद झाल्याची माहिती स्वत: त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. उप-वनसंरक्षक आदित्य मदनपोत्रा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बक्शी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १९६ (१) आणि ३५२ (१) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गौरव बक्शी याने यापूर्वी मत्यस्यउद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांची गाडी अडवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
बक्शी यांनी Instagram आणि Facebook वर एक व्हिडिओ शेअर करुन गोव्यातील वनक्षेत्र कशाप्रकारे कमी झाले याची माहिती दिली आहे. बक्शी यांनी यासाठी तत्कालिन वनमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जबाबदार धरले आहे.
“मुख्यमंत्री सावंत यांनी मेगा प्रोजेक्टसाठी राज्यातील वन्य जमीन लँड माफियां देण्यासाठी एक खिडकी योजना लागू केली. त्याचवेळी परराज्यातील नागरिक गोमंतकीयांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करतायेत असा प्रचार केला,” असा आरोप बक्शी यांनी केला.
वनक्षेत्रातील जमिनीचे रुपांतर थांबविण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सावंत यांना केली. राज्याचे कॉन्क्रीट जंगल करु नये अशा शब्दात सावंत यांना फटकारल्याचे देखील बक्शी म्हणाले.
बक्शी यांनी काय दावा केलाय?
“२०१२ ते २०१८ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सरकारने थॉमस आणि अरावजो समितीची स्थापना केली होती. या समितीने ८५५ सर्व्हे क्रमांकावरील ८.६४ सौ. किलोमीटर क्षेत्र खासगी वन म्हणून निवडले होते. २०१८ साली तत्कालिन वनमंत्री प्रमोद सावंत यांनी या दोन्ही समिती एका रात्रीत विघटीत केल्या आणि नव्या पुनरावलोकन समितीची स्थापना केली.”
“सावंत यांनी जबरदस्तीने पुनरावलोकन समितीला ‘खासगी वन’ हे ‘तात्पुरते खासगी वन’ म्हणून गृहीत धरले जावे असे सांगितले. यानंतर कंत्राटदारांना सनद देण्यास सुरुवात झाली. यामुळे १.२० कोटी सौरस मीटर वनक्षेत्र नकाशावरुन गायब झाले. सावंत सध्या करदात्यांच्या पैशावर सर्वोच्च न्यायालयात लढा देतायेत,” असा आरोप बक्शी यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.