Goa congress: भाजपावासी झालेले आमदार मायकल लोबो यांनी बुधवारी सायंकाळी कळंगुट येथील श्री शांतादुर्गा मंदिरात देवीची दर्शन घेतले. यावेळी लोबोंसोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी मायकल लोबो म्हणाले, मुळात लोकांनी काँग्रेस पक्षाला कौल दिला नव्हता. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपामध्ये सहभागी झालो.
जर जनतेचा कौल असता, तर काँग्रेस पक्ष सत्तेत असता. परंतु, मतविभागणी मोठ्या प्रमाणात झाली. किंबहुना पाच विविध राजकीय पक्षांमध्ये मते विभागली गेली. आम्हांला राज्यासह मतदारसंघाचा तसेच देशाचा विकास करायचा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हात आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही पुन्हा भाजपात बिनशर्त आलो आहोत.
हे पाऊल उचलण्यापूर्वी मी कार्यकर्त्यांसोबत आधी बैठक घेतली. त्यांना विश्वासात घेत व त्यांच्या सहकार्यानेच कळंगुट मतदारसंघाच्या विकासासाठीच मी पुन्हा भाजपावासी झाल्याचे स्पष्टीकरणही मायकल लोबोंनी यावेळी दिले.
वैचारिक मतभेद: मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून तुम्ही मध्यंतरी लक्ष्य झाला होता, असे विचारले असता लोबो म्हणाले, राजकारणात तुम्ही नेहमीच लक्ष्य होत असता. परंतु, ते कधीच वैयक्तिकरित्या घ्यायचे नसते. मुळात मी कुठलीही गोष्ट वैयक्तिक घेत नसतो. विधानसभेतील सदस्यांमध्ये कधीही शत्रुत्व नसते. फक्त वैचारिक मतभेद असतात. कारण, विधानसभेत मुद्द्यांवर किंवा प्रश्नांवर चर्चा होते, तेव्हा आमदार एकमेकांना वैचारिक पातळीवर उत्तरे देतो. तिथे कुठलेही शत्रुत्व नसते.
राज्यात ‘काँग्रेस छोडो’: काँग्रेस हा जुना पक्ष, मात्र या पक्षाच्या संघटनेची घडी विस्कटलेली आहे. सध्या काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली असली, तरी गोव्यात ‘काँग्रेस छोडो’ सुरू आहे. मुळात काँग्रेसने पक्षाची विस्कटलेली ही घडी अगोदर नीट करावी. पक्षातील अंतर्गत वाद किंवा मुद्दे सोडविण्याची आवश्यकता आहे. सध्या काँग्रेसचे जुने नेते पक्ष सोडताहेत. आधी या नेत्यांना काँग्रेसने सांभाळून पक्ष जोडण्याचा प्रयत्न करावा व नंतर भारत जोडो करावे, असा सल्ला लोबोंनी यावेळी दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.