

हरमल: उत्तर गोव्यातील समुद्रकिनारपट्टीचा भाग असलेल्या हरमल आणि मोरजी परिसरात नुकत्याच घडलेल्या दोन रशियन महिलांच्या हत्याकांडानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेचा मुख्य संशयित रशियन नागरिक असल्याने, आता गोव्यात वास्तव्य करणाऱ्या इतर रशियन पर्यटकांच्या हालचालींची चौकशी केली जाणार आहे.
विशेषतः पर्यटक व्हिसावर (Tourist Visa) असूनही छुप्या पद्धतीने येथील क्लब आणि पबमध्ये 'डीजे' (DJ) म्हणून काम करणाऱ्या रशियन नागरिकांवर पोलीस आणि गृह विभाग आता विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हरमल परिसरातील अनेक नामांकित क्लबमध्ये रशियन नागरिक मोठ्या प्रमाणावर संगीताचे कार्यक्रम आणि डीजे परफॉर्मन्स सादर करत आहेत. नियमानुसार, पर्यटक व्हिसावर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा पगार मिळवणारे काम किंवा व्यावसायिक कृत्य करण्यास सक्त मनाई आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून हरमलच्या किनारपट्टीवर रशियन पर्यटकांचा मोठा गट बेकायदा पद्धतीने व्यावसायिक मनोरंजन क्षेत्रात सक्रिय झाला आहे. स्थानिक कलाकारांच्या रोजगारावर यामुळे गदा येत असल्याच्या तक्रारीही आधीपासूनच होत्या.
हरमल आणि मोरजी येथे रशियन नागरिकानेच आपल्या सहकाऱ्यांची हत्या केल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेक विदेशी नागरिक पर्यटन व्हिसाच्या नावाखाली वर्षानुवर्षे गोव्यात वास्तव्य करतात आणि बेकायदा व्यवसायांत गुंततात.
यातूनच अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, स्थानिक पोलिसांनी आता क्लब मालकांना तंबी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.