Nagarjuna: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्जून यांच्या मांद्रे येथील जागेवरील कथित अवैध बांधकामाची पाहणी मांद्रे पंचायतीतील अधिकाऱ्यांनी केली. याबाबत तशी नोटीस आधीच मांद्रे पंचायतीच्या वतीने देण्यात आली होती. दरम्यान, या पाहणीनंतर नागार्जून यांच्या नावावर येथील सहा घर क्रमांक असून याची सखोल पडताळणी करणार असल्याचे सरपंच अॅड. अमित सावंत यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नागार्जून यांच्या वकीलाने नागार्जून यांना यापुर्वीच सर्व परवानग्या मिळाल्याचे नमूद केले आहे. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण (GCZMA - Goa Coastal Zone Management Authority) आणि माजी सरपंचांनी सर्व परवानग्या दिल्याचे त्यांच्या वकीलाने म्हटले आहे.
ग्रामपंचायतीने 29 डिसेंबर 2022 रोजी मांद्रेतील 211/2-A या मालमत्तेच्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करण्याचा ठराव केला होता. या पाहणीत अतिक्रमण झाले आहे किंवा नाही, याची पाहणी केली जाणार होती. त्यानुसार 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी साडे दहा वाजता ही पाहणी करण्याचे ठरले होते. या पाहणीवेळी आवश्यक आणि योग्य त्या दस्तऐवजांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, अशी नोटीसही पंचायतीने अभिनेते नागार्जून यांना दिली होती.
यापुर्वी अभिनेता नागार्जुन (Nagarjuna) यांचे गोव्यातील मांद्रे या गावातील बांधकाम अवैध असल्याचे सांगत पंचायतीने येथील बांधकाम बंद पाडले होते. नागार्जुन यांच्या मालकीची मांद्रे पंचायतीत सर्व्हे क्रमांक 211/2 मध्ये जमीन आहे. या जागेत बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे पंचायतीच्या लक्षात आले. सरपंच अमित सांवत यांनी यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबधित काम बंद पाडले. तसेच, अभिनेते नागार्जुन यांना पंचायतीने नोटीस देखील बजावली. गोवा पंचायत राज कायदा 1994 अंतर्गत पंचायत हद्दीत कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी किंवा खोदकाम करताना पंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगत नागार्जून यांना येथील बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.