Comunidade in Goa: श्री देवी लईराईचे मंदिर खाणपट्ट्याबाहेर काढतो, खाणकामाला पाठिंबा द्या, या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आवाहनाला आता वेगळेच वळण लागले आहे. शिरगावच्या लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी श्री लईराई देवीच्या मंदिरासह संपूर्ण गाव खाण लीज परिक्षेत्रातून बाहेर काढाच.
त्याचबरोबर खाण कंपन्यांनी गिळंकृत केलेली कोमुनिदादची जमीन अगोदर परत द्या. नंतरच कायदेशीर खाण व्यवसाय सुरू करा अशी मागणी केली आहे.समितीच्या वतीने अध्यक्ष गणेश गावकर यांनी शुक्रवारी (ता.२९) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे.
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिरगावचे श्री लईराई देवीचे मंदिर खाण परिक्षेत्रातून बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या बुधवारी मये येथे एका कार्यक्रमात केले होते.
मंदिर परिसरातील जागा सरकारची असल्यास ती मंदिराला देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२९) शिरगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी ही मागणी केली. लईराई देवीच्या मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान स्वागतार्ह तेवढेच आशादायक असल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेवेळी देवस्थानचे मुखत्यार तथा उपसरपंच जयंत गावकर उपस्थित होते. हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याबद्दल आमदार प्रेमेंद्र शेट यांचेही गावकर यांनी आभार मानले.
शिरगावचे अस्तित्व जपा
शिरगावात लईराई देवी मंदिरासह लहान-मोठी १७ मंदिरे आहेत. ३५० हून अधिक घरे, दोन शाळा, शेती-बागायती आणि नैसर्गिक जलस्रोत आहेत. गावाच्या अस्तित्वासाठी मंदिरांसह घरे-दारे, नैसर्गिक जलस्रोत मिळून संपूर्ण गावच खाण परिक्षेत्रातून बाहेर काढा, अशी आग्रही मागणी देवस्थान समितीने केली आहे.
‘ती’ जमीन परत द्या
पूर्वी शिरगावात जो खाण व्यवसाय सुरू होता, तो बेकायदा व कोमुनिदादच्या जागेत चालत होता. 1971 साली झालेल्या भू-सर्व्हेक्षणावेळी खाण कंपन्यांनी कोमुनिदादची जागा गिळंकृत केली. याला प्रशासकीय यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे, असा आरोप गावकर यांनी केला.
...म्हणून न्यायालयात सादर केली याचिका
शिरगाव खाण ब्लॉकचा लिलाव करण्यापूर्वी खाण लीजमधून गाव बाहेर काढावा, अशी मागणी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न करता खाण ब्लॉकचा लिलाव केला. मंदिरांसह गावाचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी दोन महिन्यांपूर्वी देवस्थानतर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आता केलेले विधान हे गावाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने हिताचे असून, गाव खाण लीजमधून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक असल्याचा आशावाद निर्माण झाला आहे. असे गणेश गावकर यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.