Goa Accident : फोंडा-पणजी महामार्गावरील कुंडई येथे झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार झाला तर पाचजण जखमी झाले. भरधाव ट्रक मानसवाडा-कुंडई येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानावर कोसळल्याने हा अपघात झाला.
ही घटना काल संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. दरम्यान, येथे वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे पंधरवड्यात उपाययोजना करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
मंगलोर येथून मासे घेऊन रत्नागिरीला निघालेला ट्रकचालकाचा (क्र. केएल 07 सीपी 2580) कुंडई येथे उतरणीवर ताबा सुटल्याने या ट्रकने आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली.
नंतर चिऱ्याच्या दुकानाला धडक देऊन हा ट्रक स्थिरावला. या अपघातात सर्वेश बसाक (32) हा मूळ पश्चिम बंगाल पण सध्या कुंडई येथे राहणारा ठार झाला.
या अपघातात दर्शनी दयानंद गावडे (45, कुंडई), उमाजी दीपक नाणूसकर (31, कुंडई, रा. मूळ तिरोडा-सिंधुदुर्ग), विश्वजीत म्हसकर (34, कुंडई) तसेच ट्रकचालक बिजील थॉमस (31) व शरथ (34, दोघेही रा. मूळ कोची-केरळ) अशी जखमींची नावे आहेत.
कारचालकाने सोडले प्राण
साळ : नानोडा लाटंबार्से येथे वळणावर 9 फेब्रुवारीला कदंब बस व अल्टो कारमध्ये झालेल्या अपघातात सासरे आणि सून यांचा मृत्यू झाला होता. यावेळी कारचालक आशिष अनंत परब (रा.साळ, डिचोली) हे देखील गंभीर जखमी झाले होते.
काल संध्याकाळी बांबोळी येथे गोमेकॉत उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सध्या मृत सून सोनाली यांची आई शुभदा रेडकर (रा. बांदा, सिंधुदुर्ग) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
म्हापशात पोलिस जखमी
म्हापसा : कामरखाजन येथे पर्वरी पोलिस स्थानकातील कॉन्स्टेबल प्रजय तळावणेकर (31, रा. मावसावाडो-पेडणे) यांच्या दुचाकीने बुधवारी रात्री 8 च्या सुमारास प्रवासी टॅक्सीला मागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.
अटल सेतूवरही अपघात : अटल सेतूवर एका कारचा स्वयंअपघात झाला. यात दोघेजण जखमी झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.