फोंडा: राज्यातील इतर मागासवर्गीय ओबीसींच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात, यासाठी पुन्हा एकदा ओबीसी महासंघ इतर मागासवर्गीय आयोगासह संबंधित मंत्री, आमदारांची भेट घेणार आहे. बांदोडा - फोंडा येथे झालेल्या गोवा राज्यातील ओबीसी महासंघाच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याबरोबरच प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती ओबीसी महासंघाचे गोवा राज्य अध्यक्ष मधू नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार शाम सातार्डेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा मतदारसंघात सत्तावीस टक्के आरक्षण तसेच ओबीसींसाठी खास मंत्रालय आणि सत्तावीस टक्के अंदाजपत्रकात तरतूद तसेच गेली तीन वर्षे रखडलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना त्वरित मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्यांचे एक निवेदन मुख्यमंत्री तसेच इतर सर्व मंत्री आमदारांना यापूर्वीच देण्यात आले असून आता निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार कार्यरत झाल्यामुळे ओबीसी महासंघाने आपल्या मागण्या धसास लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राज्यात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. निवडणुकीच्यावेळी ओबीसी मतांच्या टक्केवारीवर संबंधित आमदारांचे भवितव्य घडवले जाते, मात्र ओबीसींच्या मागण्या प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांसह इतरांवर अन्याय झाला आहे. येत्या पंचायत निवडणुकीसंबंधीही चर्चा करून ओबीसी उमेदवारांना निवडून आणण्याबाबत विचारविनिमय झाला. सध्या ओबीसींचे आरक्षण अडचणीत आले असून जातनिहाय जनगणनेनुसार आवश्यक अहवाल उपलब्ध नसल्याने हे आरक्षण करणे मुश्किलीचे ठरले असल्याने त्यावरही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शाम सातार्डेकर व मधू नाईक यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.