AAP MLA Venzy Viegas : मणिपूरमध्ये घडलेली घटना अतिशय संवेदनशील आहे. गोव्यात अशी घटना घडू देणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याच्या जनतेला आश्वस्त करायला हवे होते; परंतु तसे काही घडले नाही. उलटपक्षी आम्हाला निलंबित करण्यात आले.
आमदार जीत आरोलकर काही आमचे शत्रू नाहीत. विधानसभेत ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मुख्यमंत्री, आरोलकर हसत होते, हे सर्वांनी पाहिलेय. हे सरकार हुकूमशाही गाजवू पाहतेय; परंतु आम्ही हुकूमशाही खपवून घेणार नसल्याचे ‘आप’चे नेते व बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले. ते ‘गोमन्तक टिव्ही’वर संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान व्हिएगस म्हणाले, राज्यात शैक्षणिक क्षेत्राची दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षणाची सर्वात खराब अवस्था आहे. पर्यटन क्षेत्रात बाणावली मतदारसंघाचे योगदान महत्त्वाचे असल्याने रस्ते तसेच इतर कामे होणे गरजेचे आहे.
सतत पाठपुरावा केल्यानंतरच दहापैकी दोन कामे होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, रोजगार असे विविध प्रश्न प्रलंबित आहेत; परंतु ते सोडविले जात नाहीत.
पहिले मोहल्ला क्लिनिक
बाणावलीत राज्यातील पहिले मोहल्ला क्लिनिक उघडले आहे. जेथे रुग्ण मोफत आरोग्यसेवा घेतात. नेत्रचिकित्सा केंद्र आहे. जेथे बाणावली मतदारसंघातील नागरिकांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाते.
राज्यातील व्यक्तींना ५० टक्के सवलत दिली जाते. राज्यातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात या सुविधेचा लाभ घेतात; कारण मोतिबिंदू शस्त्रक्रिया ‘डीडीएसएसवाय’अंतर्गत येत नाही. त्यामुळे गोव्यात काही वर्षांत बाणावली मॉडेल राबविले जाईल, अशी आशा व्हिएगस यांनी व्यक्त केली.
अनेकदा मंत्रिपदाची ऑफर
आम्ही सरकारात सामील व्हावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. अनेकदा विचारणा करण्यात आली. मला अनेकदा मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली; परंतु आम्ही ‘आप’चे दोन्ही आमदार कधी डगमगलो नाही.
आम्ही आमचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विचारसरणीशी बांधील आहोत आणि आमच्या तत्त्वांवर ठाम असल्याचे व्हिएगस यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.