
पणजी: गोव्यात पर्वरी येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे खापरेश्वर मंदिराला तसेच २०० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला हटवण्यात आले. यानंतर स्थानिकांनी रोष देखील व्यक्त केला. सध्या पणजीत सांतिनेजमध्ये देखील स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक अमित पालेकर यांनी पणजीत सुरु असलेल्या कामावर प्रश्न उपस्थित केलाय. भाकिया कसन्स्ट्रक्शनकडून सुरु असलेला हा प्रकल्प अजून काही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही असं म्हणत याविरुद्ध आता आवाज उठवावा लागेल असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय.
राजधानी पणजीत गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरु आहे आणि आता कामाच्या नावाखाली पैशांची लूट चालवली आहे की काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात एवढं सगळं होऊन सुद्धा शांत कसेकाय असं म्हणत त्यांनी ३१ मार्च पर्यंत हे काम पूर्ण होण्याचे कोणतेही संकेत दिसत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आव्हान दिले आहे.
या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी करत सांतिनेजमध्ये सुरु असलेल्या या कामाचे तपशील जाहीर करण्याची मागणी त्यांनी केलीये. "आमचो चीफ इंजिनियर गड्डो?" असं म्हणत त्यांनी सुरु असलेल्या प्रकल्पाबद्दल माहिती देण्यासाठी कोणीही का पुढे येत नाही? असा प्रश्न उपस्थित केलाय.
पर्वरी येथे सुरु असलेल्या महामार्गाच्या कामामुळे खापरेश्वर मंदिर हटवण्यात आले. पणजीत लोकांना जर का सांतिनेजमधील वडाचे झाड हटवायचे नसेल तर त्यांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे. पणजीच्या आमदारांनी यात लक्ष दिले पाहिजे असं पालेकर म्हणालेत. विकासाच्या नावाखाली पर्वरीतील झाड हटवले मात्र पणजीकरांना पणजीत याची पुनरावृत्ती नको असल्यास त्यांनी एकत्र येऊन वेळीच याला पूर्णविराम लावला पाहिजे असं आवाहन पालेकरांनी केलं आहे. गावाच्या राखणदाराने कुठे राहावं हे सुद्धा आता सरकारच ठरवणार का? असा रोखठोक सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.
पर्वरीप्रमाणेच वास्को आणि पणजी येथे देखील वडाची झाडं धोक्यात आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. पोलीस खातं आपल्या मदतीसाठी येणार नाही, आपण सर्वजण गुंड बनून याला सामोरं जाऊया असं म्हणत त्यांनी 'वास्कोचो गुंड खंय रे तों?' असं म्हणत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना देखील वास्कोत सुरु असलेल्या हालचालींमध्ये लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.