
पणजी: गोवा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने युतीबाबत मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर आपने गोव्याकडे मोर्चा वळवला असून, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिषी यांनी गोव्याला भेट दिली. या भेटीत त्यांनी राज्यातील आगमी निवडणुकांच्यापूर्वी युतीबाबत मोठे भाष्य केले आहे.
आतिषी यांनी आज (१० मार्च) नावेली येथील ‘ब्ल्यू बेल बिल्डिंग’मधील ‘आप’च्या या कार्यालयाचं उद्घाटन केले. यावेळी आतिषी यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'काँग्रेसवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पालिका आणि २०२७ सालची विधानसभा निवडणूक आप स्वबळावर लढणार', असे आतिषी यांनी जाहीर केले. आम आदमी पक्षाने स्वबळाचा नारा दिल्याने गोव्यात इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
"मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षांतर केले. राजकीय पंडीत आपचे आमदार पक्षांतर करतील असा दावा करत होते पण, ते अजूनही पक्षात आहेत आणि काम करतायेत. काँग्रेसवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्याशी आप युती करणार नाही", असे आतिषी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अमित पालेकरांनी दिल्लीच्या निकालानंतर गोव्यात कांग्रेससोबत युती करणे हाच पर्याय असेल, असा सल्ला दिला होता. पण, आतिषी यांच्या वक्तव्यानंतर तुर्तास युतीच्या आशा मावळल्याचे दिसत आहे.
अमित पालेकरांनी युतीचा दिला होता सल्ला
दिल्लीत आम आदमी पक्षाला भाजपकडून पराभवाचा मोठा धक्का बसला होता. यानंतर आपचे गोवा संयोजक अमित पालेकरांनी गोव्यात काँग्रेससोबत युती हाच पर्याय असल्याचे वक्तव्य केले होते. दिल्लीत अनेक जागा काँग्रेससोबत युती असती तर गमावल्यानंतर नसत्या असा दावा पालेकरांनी केला होता. गोवा निवडणुकीपूर्वी हा महत्वाचा संदेश दिल्लीच्या निवडणुकीतून मिळाल्याचे पालेकर म्हणाले होते. दरम्यान, आतिषी यांनी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे जाहीर केल्याने पालेकरांचा सल्ला विचारात घेतला नसल्याचे दिसून येते.
इंडिया आघाडीत फूट
लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुरुवातीला दक्षिणेतून विद्यमान आमदार वेंझी व्हिएगस यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ती माघारी घेण्यात आली होती. आम आदमी पक्षाने नंतर इंडिया आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय आघाडीत गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी (शरद पवार), आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) हे पक्ष आहेत. दरम्यान, आता आतिषी यांनी युती होणार नसल्याचे जाहीर केल्याने हा इंडिया आघाडीला देखील मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय हालचालींना वेग
गोव्याची विधानसभा निवडणूक अजून दोन वर्षे लांब आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी राज्यात हालचालींना सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्याच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी राज्यात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विविध मंत्री आणि नेत्यांची भेट घेतली. संतोष यांच्या दौऱ्याने राज्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील गोव्यात एन्ट्री केली असून, नुकताच त्यांचा राज्यव्यापी मेळावा डिचोलीत पार पडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.