मिलिंद म्हाडगुत
फोंडा पालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राजकीयदृष्ट्या अनेक धक्कादायक घटना घडल्या. दोन प्रभागांतील उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याचबरोबर एकूण उमेदवारांची संख्याही कमी झाली. सुरवातीला बरेच इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार असे दिसत होते.
गेल्या खेपेला १५ प्रभागांकरिता ७५ उमेदवार रिंगणात होते. पण यावेळी फक्त ५२ उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे प्रतिसाद कमी असल्याचे जाणवले. आणि आता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रभाग क्रमांक ७ व १३ मधल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे या प्रभागातील निवडणुका सुरू होण्याच्या आधीच संपल्याचे दिसून आले. उमेदवारांची संख्याही ४५ पर्यंत घसरली आहे.
मुख्य म्हणजे यंदा प्रतिसाद कमी का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जाते. काही प्रभागांची ज्याप्रकारे पुनर्रचना केली गेली आहे ती अनेक इच्छुक उमेदवारांच्या अंगलट आलेली दिसते आहे. काही प्रभाग तर जोडतोड करून बनवलेले दिसत आहेत. त्यामुळे कोणत्या प्रभागात उमेदवारी भरावी या विवंचनेत पडलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचे पसंत केले.
उमेदवारी अर्ज भरण्याआधीच तिन्ही पक्षांनी आपले पॅनल जाहीर केले होते. पण यावेळी अजूनपर्यंत तरी एकाही राजकीय पक्षाने आपले पॅनल जाहीर केलेले नाही. आणि आता दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे पॅनल जाहीर करण्यात अर्थही राहिलेला नाही.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या पॅनलतर्फे पंधराही उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण यावेळी काँग्रेसने किती उमेदवार उभे केले आहेत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. काही प्रभागात तर काँग्रेसला उमेदवारच मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे.
म.गो.च्या समर्थक असलेल्या विद्या पुनाळेकर यांचे बिनविरोध निवडून येणे व लगेच भाजपमध्ये प्रवेश करणे हाही अशाच एका नव्या समीकरणाचा भाग समजला जात आहे. त्याचे अनेक अन्वयार्थ काढले जात आहेत. पण एक मात्र खरे; सध्या पालिकेतल्या राजकारणापेक्षा फोंड्यात वेगळेच राजकारण सुरू असून त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसायला लागणार आहेत.
आरक्षण हाही कळीचा मुद्दा ठरला. प्रभाग क्रमांक ११चे उदाहरण घ्या. या प्रभागात चार ते पाच इच्छुक उमेदवार गेले एक वर्ष कार्यरत होते. पण प्रभाग महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे त्यांच्या आशांवर पाणी पडले.
विशेष म्हणजे हा प्रभाग सलग तीनवेळा आरक्षित झाला आहे. हा जर प्रभाग खुला असता तर आज पाच ते सहा उमेदवार रिंगणात असते. तीच गोष्ट प्रभाग क्रमांक दहाची. यंदा हा प्रभाग इतर मागासवर्गीय महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे फक्त तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या खेपेला या प्रभागातून सहा उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
आणखी या यंदाच्या फोंडा पालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सध्याचे वीजमंत्री व म.गो. पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांची त्रयस्थ भूमिका. अजूनपर्यंत तरी त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. गेल्या पालिका निवडणुकीत त्यांनी पालिका कक्ष अक्षरशः पिंजून काढला होता. आणि त्यामुळेच म.गो.प्रणित रायझिंग फोंडाने सात जागा प्राप्त केल्या होत्या.
त्यावेळीही सरकारात आताप्रमाणेच म.गो.-भाजपची युती होती आणि तरीही दोन्ही पक्षाचे समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. मुख्य म्हणजे त्यावेळी अनेक ठिकाणी निकटची लढत झाली होती. म.गो., भाजप व काँग्रेस यांच्या पॅनल मध्ये अटीतटीची शर्यत लागली होती.
‘बिनविरोध’ची पहिलीच वेळ
प्रभाग क्र. ७ मधील माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी व प्रभाग क्रमांक १३ मधल्या माजी नगरसेविका विद्या पुनाळेकर या बिनविरोध निवडून आल्यामुळे फोंड्यात तरी एक नवा इतिहास घडला आहे. दोन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची फोंडा पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून राजकीय विश्लेषक त्याला अनेक अर्थ लावत आहेत.
दळवींचे ‘वजन’ वाढणार?
प्रभाग क्रमांक सातमधून बिनविरोध निवडून आलेल्या विश्वनाथ दळवींनी ‘हॅट्ट्रिक’ तर साधली आहेच त्याचबरोबर आपले भाजपमधील ‘वजन’ वाढवण्यात ते यशस्वी ठरलेले दिसत आहेत. दळवी हे सध्या फोंडा भाजपचे गट अध्यक्ष म्हणून कार्यरत असून ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात आहेत.
प्रभाग ११ हा महिलांसाठी आरक्षित
प्रभाग ११ महिलांकरता आरक्षित झाला आहे. त्यामुळे रितेश नाईक यांनी आपला मोर्चा प्रभाग ५ कडे वळविला आहे. विशेष म्हणजे प्रभाग ११ सलग तीनवेळा आरक्षित झाला आहे. आता यावेळी काँग्रेस पॅनेलतर्फे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिक्रे यांची कन्या शुभलक्ष्मी तर डॉ. भाटीकरांच्या ‘रायझिंग फोंडा’ पॅनेलतर्फे विवेकानंद वळवईकर यांच्या पत्नी वेदिका या निवडणूक लढवीत आहेत. आता यात भाजप प्रणित पॅनेलच्या प्रियांका वेरेकर काय रंग भरतात ते बघावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.