Elections (श्यामकांत नाईक) : सावर्डे मतदारसंघातून दीपक पाऊसकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. नाराज कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी गणेश गावकर यांना संधी देण्याचा निर्धार केल्याने या मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होणार आहे. यावेळी सावर्डे (Savardem) मतदारसंघात भाजपचे उमेदवार गणेश गावकर व दीपक पाऊसकर (Dipak Pauskar) यांच्यामध्ये सरळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी सावर्डे मतदारसंघातून भाजपचे गणेश गावकर, अपक्ष उमेदवार दीपक पाऊसकर, मगोचे बालाजी गावस, आम आदमी पक्षाचे (AAP) अनिल गावकर व मनिष लांबोर निवडणुकीत उतरणार असून यात गणेश गावकर व दीपक पाऊसकर यांच्यामध्येच खरी लढत होणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
2017 च्या निवडणुकीत मगोचे दीपक पाऊसकर यांनी भाजपचे गणेश गावकर यांचा सुमारे पाच हजार मतांनी पराभव केला होता. 2019मध्ये पाऊसकर यांनी मगो पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता व त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपदही बहाल करण्यात आले होते. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी सावर्डे मतदारसंघात अनेक विकासकामे सुरू केली होती, यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यश आले होते. तसेच कुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशी अनेक विकासकामे त्यांनी सुरू केली होती.
दीपक पाऊसकर हे भाजप उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते, पण पक्षाने तिसऱ्यांदा पाऊसकर यांना उमेदवारी न देता गणेश गावकर यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिल्याने पाऊसकर यांचे कार्यकर्ते भाजप नेतृत्वावर संतापले आहेत. पाऊसकर यांनी भाजपची उमेदवारी मिळेल या अपेक्षेने घरोघरी भेटी देऊन प्रचाराला सुरुवातही केली होती. पण त्यांना उमेदवारी नाकारली गेल्याने त्यांनी सावर्डेतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे भाजपसमोर हे जबरदस्त आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, असे जरी असले तरी मूळ भाजप कार्यकर्त्यांचा पाऊसकर यांच्यावर विश्वास नसून त्यांनी गावकर यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आहे. सावर्डे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने ही लढत अटीतटीची होण्याचे संकेत आहेत. गणेश गावकर यांचेही सावर्डेत बरेच निकटचे कार्यकर्ते असून भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ते पुन्हा उघडपणे त्यांच्या बरोबर प्रचार करताना दिसताहेत. गावकर यांनीही आपल्या कार्यकाळात सावर्डे मतदारसंघातील युवकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या. याचा लाभ त्यांना होणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. उलट पाऊसकर यांनी विकासकामे केली आहेत, पण नोकऱ्या मिळवून देण्यास ते बरेच कमी पडले आहेत. याचा फटका त्यांना बसू शकतो.
मगोने युवा कार्यकर्ते बालाजी गावस यांना उमेदवारी दिली असून त्यांना काही खाण कामगारांचा पाठिंबा आहे.अनिल गावकर यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असून ते आप तर्फे निवडणूक लढवत आहेत. कुळे पंचायतीचे सरपंच मनिष लांबोर यांनीही आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्याने लढतीला वेगळाच रंग चढणार असल्याचे दिसते.
मगोचा प्रभाव अजूनही कायम
सावर्डे मतदारसंघ हा एकेकाळी मगोचा बालेकिल्ला होता. अजूनही या मतदारसंघात मगोचा प्रभाव कायम आहे. मागच्यावेळी या मतदारसंघात लोकांनी भाजपचे गणेश गावकर यांना डावलून मगोचे दीपक पाऊसकर यांना निवडून दिले होते. मात्र पाऊसकर यांनी मगोशी प्रतारणा करून भाजपशी घरोबा केल्याने मतदार काही प्रमाणात नाराज असून त्याचा लाभ मगोचे बालाजी गावस यांना मिळण्याची शक्यता चर्चेत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.