200 year Old Portuguese era Coin Found In Goa Sattari
सत्तरी : पोर्तुगीज राजवटीत गोव्याला भारतातील पोर्तुगालीन कॉलनी म्हणून ओळखलं जायचं मात्र आज गोवा मुक्तीच्या अनेक वर्षांनंतर देखील इथे पोर्तुगालीन सत्तेच्या खुणा पाहायला मिळतात.
अलीकडेच देरोडे-सत्तरी येथील बाबू गावकर यांना शेतात पोर्तुगीजकालीन तांब्याचे नाणे सापडले असून ते सुमारे २०० वर्षे जुने आहे.
परीक्षण केल्यानंतर पुरातत्त्वतज्ज्ञ वरद सबनीस यांनी १८२८ ते १८३४ या काळात पोर्तुगालचा राजा असलेल्या डोम मिगुएल पहिला याच्या काळातील हे नाणे असल्याचे सांगितले.
बाबू गावकर हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना काही महिन्यांपूर्वी एक नाणे सापडले होते आणि काहीसे जुने वाटणारे हे नाणे त्यांनी वरद सबनीस यांना दाखवले. तेव्हा सबनीस यांनी नाण्याबद्दल सदर माहिती दिली.
नाण्याचे वजन अंदाजे ३८ ते ४० ग्रॅम असून त्यावर ‘एपी’ आणि ‘टी’ असे कोरलेले आहे. नाण्यावर लिहिलेल्या 'एपी' चा अर्थ आशिया पोर्तुगीज आणि ‘टी’ चा अर्थ ‘टांगा रे’ असा होतो. ‘टांगा रे’ पूर्ण नाणे होते, तर अर्ध्या टांगाचे वजन सुमारे १८-२० ग्रॅम होते.
बाबू गावकर यांना ज्या ठिकाणी हे नाणे सापडले, ते ठिकाण सत्तरीला डोंगरावरील बाजारपेठेशी जोडणाऱ्या व्यापारी मार्गालगत आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक कलाकृती शोधण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त असल्याचे सबनीस म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.