

पणजी: गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या जुन्या आणि कालबाह्य झालेल्या बसगाड्यांच्या ओझ्याखाली दबलेली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात तब्बल 779 बसगाड्या अशा आहेत, ज्यांनी 15 वर्षांचा कालखंड पूर्ण केला आहे, तरीही त्या रस्त्यांवर धावत आहेत. राज्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. या माहितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
वाहतूक मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या बसगाड्या पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत. गेल्या वर्षभरात वाहतूक विभागाने प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 60 बसगाड्यांवर दंडात्मक कारवाई केली. जुन्या गाड्यांमधून बाहेर पडणारा काळा धूर आणि उत्सर्जित होणारे वायू हवेची गुणवत्ता खराब करत आहेत. मात्र, 779 गाड्यांपैकी केवळ 60 गाड्यांवर झालेली कारवाई पाहता, अजूनही मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य बसगाड्या बिनदिक्कतपणे धावत असल्याचे स्पष्ट होते.
एकीकडे जुन्या बसगाड्यांची समस्या असताना, दुसरीकडे सरकार गोव्यात (Goa) 'ग्रीन मोबिलिटी' वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. सध्या गोवा राज्यात 141 इलेक्ट्रिक बसगाड्या सेवेत आहेत. या बसगाड्यांच्या कंत्राटदारांना पेमेंट करण्यासाठी सरकारने आतापर्यंत 77.77 कोटी रुपये खर्च केले आहेत. खाजगी कंत्राटदारांच्या माध्यमातून या इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात असून डिझेल बसवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्र सरकारच्या नवीन 'स्क्रॅपेज पॉलिसी'नुसार 15 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या सरकारी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्या भंगारात काढणे आवश्यक आहे. असे असताना गोव्यात इतक्या मोठ्या संख्येने जुन्या बसगाड्या चालवल्या जाणे हे केवळ नियमांचे उल्लंघन नसून प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. या जुन्या बसगाड्यांचे इंजिन, ब्रेक यंत्रणा आणि अंतर्गत बांधणी कमकुवत झालेली असते, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
वाहतूक विभागाने दिलेल्या या आकडेवारीनंतर आता विरोधी पक्षांनी आणि पर्यावरण प्रेमींनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जर सरकार 77 कोटी रुपये इलेक्ट्रिक बसवर खर्च करु शकते, तर मग या 799 जुन्या बसगाड्या टप्प्याटप्प्याने बंद करुन तिथे नवीन आणि सुरक्षित बसगाड्या का आणल्या जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. येणाऱ्या काळात या जुन्या बसगाड्यांवर कडक कारवाई होते की त्या तशाच रस्त्यांवर धावत राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.