
75 Years Of Vande Mataram
पणजी: ‘वंदे मातरम्’ हा राष्ट्राचा महामंत्र आहे. या महिन्याच्या २४ तारखेला ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कन्याकुमारी विवेकानंद केंद्राच्या गोवा शाखेतर्फे राज्यातील सर्व विद्यालयांत सकाळी १० वाजता एकाच वेळी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत गायिले जाणार आहे.
सामूहिक शक्ती प्रकट होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वंदे मातरम् सार्धशती समितीचे अध्यक्ष व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच कार्यवाह वल्लभ केळकर यांनी केले आहे.
यासाठी सर्व शाळांनी सकाळी १० वाजता विशेष प्रार्थनासभेचे आयोजन करावे. सुरवातीला भारतमातेचे पूजन करून थोडक्यात या विषयाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना द्यावी. शिक्षण खात्याने पाठवलेल्या पत्रात दिलेला गुगल फॉर्म सर्वांनी भरावा व त्यात सहभागी होणाऱ्या सर्व मुलांची व शिक्षकांची संख्या कळवावी.
राष्ट्राची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य ‘वंदे मातरम्’ या महामंत्रात आहे. ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून ‘वंदे मातरम्’ हे गीत ७ नोव्हेंबर १८७५ मध्ये अवतरले. यंदा या गीताची १५०वी जयंती साजरी केली जात आहे. या एका गीताने आणि त्याच्या दोन शब्दांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलला, नव्हे घडविला.
याबाबत अधिक माहितीसाठी शाळाप्रमुखांनी तालुका समन्वयकांशी संपर्क साधावा. त्यात पल्लवी मांद्रेकर (बार्देश), प्रतिभा चुरी (पेडणे), श्रुती बगळी (तिसवाडी), रुपाली डोईफोडे (डिचोली), क्षमा मराठे (सत्तरी), प्रजय वझे (फोंडा), अनामिका वरक (सांगे व धारबांदोडा), वैभवी काणकोणकर (काणकोण), पूजा वझे (सासष्टी) करुणा म्हावळिंगकर (मुरगाव) यांचा समावेश आहे.
या निमित्ताने एकाच दिवशी, एकाच वेळी गोव्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांत संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत गायिले जाणार आहे. हा एक मोठा विक्रम गोव्याच्या इतिहासात होणार आहे. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतरांनीसुद्धा आपल्या कार्यस्थानी, कार्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीत गाऊन या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी व्हावे.
या कार्यक्रमानंतर समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जाणार आहेत. वंदे मातरम् गायन स्पर्धा, वंदे मातरम्वर नृत्य सादरीकरण, प्रश्नमंजूषा, प्रदर्शनी चर्चासत्र, देखावे, अभिवाचन कार्यक्रम, व्याख्याने, प्रभातफेरी, रांगोळी, चित्रकला स्पर्धा अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.