
पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून, नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व प्रमुख धबधबे, खाणींचे खंदक, नद्या, तलाव आणि अन्य जलस्रोतांमध्ये नागरिकांनी प्रवेश करण्यावर आणि पोहण्यावर ६० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
दक्षिण गोव्यातील जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी हा आदेश जारी करत सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस निरीक्षक आणि मामलेदार यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी या ठिकाणी नियमित गस्त घालण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नवीन दंड संहितेच्या (BNS) कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट चेतावणीही प्रशासनाने दिली आहे. विशेषतः पर्यटन हंगाम जवळ येत असताना, अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय अत्यावश्यक ठरला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गोव्यातील अनेक धबधबे आणि जलस्रोत हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असले तरी पावसाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वेगाने वाढतो आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिक असतो. मागील वर्षी अशाच प्रकारच्या घटनांमध्ये काही पर्यटकांचे प्राण गेले होते. त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच प्रशासन सजग झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.