Goa Kadamba : कदंबचे इलेक्ट्रिक बसचालक पगारवाढीसाठी गेले संपावर; ‘एस्मा’खाली कारवाईची तयारी

महामंडळाकडून पर्यायी व्यवस्था
Kadamba Electric Bus
Kadamba Electric BusDainik Gomantak
Published on
Updated on

पगारवाढ करा, अशी मागणी करून कदंब महामंडळासाठी इलेक्ट्रिक बस चालवणाऱ्या १४० चालकांनी सुरू केलेला संप मागे घेण्यास नकार दिला असून दुसऱ्या बाजूने कदंब वाहतूक महामंडळाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच संपावरील चालकांवर अत्यावश्यक सेवा (एस्मा) कायद्याखाली कारवाईची तयारी चालविली आहे.

महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी ‘गोमन्तक''शी संवाद साधताना सांगितले की, हा संप पूर्णतः बेकायदेशीर आहे. अकस्मात संपावर जाणे म्हणजे प्रवाशांना वेठीस धरण्यासारखे आहे. या चालकांचा कदंब महामंडळाशी तसा थेट संबंध नाही. ते खासगी कंपनीसाठी काम करतात.

तरीही कदंब महामंडळाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या चालकाएवढेच वेतन त्यांना मिळते. या चालकांवर कारवाई करावी, यासाठी कदंब महामंडळाला सेवा पुरविणाऱ्या त्या खासगी कंपनीला आम्ही पत्र लिहू, असे त्यांनी सांगितले.

Kadamba Electric Bus
Goa Electricity : कर्नाटकमुळेच गोव्यात उद्‍भवला वीजप्रश्‍न : मंत्री ढवळीकर

२५ हजार मानधन हवे!

कदंब महामंडळाने या ५१ बसेस ‘ऑलेक्ट्रा’ या खासगी कंपनीकडून भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतल्या असून त्या बसेसवर हे जवळपास १४० कंत्राटी चालक आहेत. या बसचालकांनी त्यांच्या पगारात वाढ व्हावी, अशी मागणी केली आहे. दरमहा २५ हजार मानधन हातात मिळाले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

संप बेकायदेशीर

हा संप बेकायदेशीर असून या चालकांनी आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाही. हे सर्व चालक कंत्राटी पद्धतीने काम करणारे असून त्यांना कदंबच्या रोजंदारीवरील चालकांपेक्षा जास्त पगार मिळतो, असे उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

Kadamba Electric Bus
Goa Congress : शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात सरकारला अपयश

प्रवाशांना मन:स्ताप

या संपात एकूण ५१ बसेस बंद राहिल्या. यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. मडगाव-पणजी, मडगाव-वास्को आणि मडगाव-कारवार या रस्त्यांवर या बसेस चालतात. मात्र, या बसचालकांनी बसेस चालविण्यास नकार दिल्याने कदंब महामंडळासमोर मोठा पेच निर्माण झाला. त्यामुळे त्यांना आपले चालक या बसेसवर पाठवावे लागले.

"हे चालक कदंब महामंडळाचे नसून ते खासगी कंपनीचे आहेत. सध्या यातील निम्म्या बसेस आम्ही आमचे चालक वापरून रस्त्यावर उतरविल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत हे चालक पुन्हा बस चालविण्यास आले नाहीत तर शनिवारी आम्ही सर्व बसेस आमच्या चालकांचा वापर करून त्या पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणू."

उल्हास तुयेकर, अध्यक्ष, कदंब वाहतूक महामंडळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com