

अवित बगळे
पणजी: पर्यावरण खात्याच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या गणेश मूर्तिकार, मूर्ती विक्रेत्यांनी स्वतःहून दिलेल्या माहितीनुसार, ९० अर्जदारांनी (१९.१ टक्के) मूर्तींमध्ये ‘पीओपी’ असल्याचे जाहीर केले असून, या श्रेणीत २२,८८६ मूर्ती आहेत.प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात ‘पीओपी’च्या वापराबाबतच्या नोंदणीतील माहितीही महत्त्वाची आहे.
एकूण ४७० नोंदण्यांपैकी ३८० अर्जदारांनी म्हणजे ८०.९ टक्के अर्जदारांनी मूर्तींमध्ये ‘पीओपी’ नसल्याचे नमूद केले आहे. या नोंदण्यांमध्ये ५४,२५० मूर्ती आहेत. एकूण ७७,१३६ मूर्तींपैकी ५४,२५० म्हणजे ७०.३ टक्के मूर्ती ‘पीओपी’विरहित, तर २२,८८६ म्हणजे २९.७ टक्के मूर्तींमध्ये ‘पीओपी’ असल्याचे अर्जांमध्ये नमूद आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्तींबाबत सकारात्मक चित्र दिसत असले तरी जवळपास तीनपैकी एका मूर्तीच्या संख्येइतक्या मूर्तींशी ‘पीओपी’चा संबंध असल्याचे घोषित झाले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी गोव्यात गणेशमूर्तींची मोठी तयारी सुरू असून, गणेशमूर्ती नोंदणी पोर्टलवरील अर्जांच्या विश्लेषणातून राज्यात तब्बल ७७ हजार १३६ मूर्तींची नोंद झाल्याचे समोर आले आहे. पोर्टलवर एकूण ४७० अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ४४४ अर्जदार स्वतंत्र आहेत. पुनरावृत्ती झालेल्या २६ अर्जांची छाननी करून एका अर्जदाराने जाहीर केलेल्या सर्वाधिक मूर्तींची संख्या ग्राह्य धरल्याने एकूण संख्या ८० हजार ८९१ वरून ७७ हजार १३६ झाली आहे. म्हणजेच पुनरावृत्तीमुळे ३,७५५ मूर्तींची, म्हणजे ४.६ टक्के घट करण्यात आली.
मूर्ती बनविणाऱ्यांची संख्या अधिक
१. नोंदणीकृत अर्जांमध्ये मूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळांचा वाटा सर्वाधिक आहे. एकूण ४७० नोंदण्यांपैकी ३७० नोंदण्या म्हणजे ७८.७ टक्के नोंदण्या चित्रशाळेशी संबंधित आहेत. त्याखालोखाल १९१ नोंदण्या म्हणजे ४०.६ टक्के विक्रीशी संबंधित आहेत. याशिवाय ५१ नोंदण्या (१०.९ टक्के) वितरण आणि ४५ नोंदण्या (९.६ टक्के) मूर्ती साठवणुकीशी संबंधित आहेत. एका अर्जदाराने एकापेक्षा अधिक कामांची नोंद केली असल्याने हे प्रमाण एकत्रित १०० टक्के होत नाही.
२. केवळ चित्रशाळा म्हणून नोंदलेल्या अर्जांची संख्या २७८ (५९.१ टक्के) आहे. केवळ विक्री करणारे ९० (१९.१ टक्के) असून, विक्री आणि चित्रशाळा अशी दोन्ही कामे करणारे ४८ (१०.२ टक्के) आहेत. तर विक्री, चित्रशाळा, वितरण आणि साठवणूक अशा चारही प्रकारच्या कामांची नोंद असलेले ३९ अर्ज (८.३ टक्के) आहेत.
डिचोलीत सर्वाधिक १६,८२४ मूर्ती
१. तालुकानिहाय आकडेवारीत डिचोली अव्वल ठरला आहे. डिचोलीत ९५ नोंदण्या असून त्यातून १६,८२४ मूर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण नोंदण्यांपैकी २०.२ टक्के, तर मूर्तींच्या संख्येपैकी २१.८ टक्के वाटा डिचोलीचा आहे.
२. मूर्तींच्या संख्येत केपे तालुका १२,५१५ मूर्तींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे केपेतील नोंदण्या केवळ २१ म्हणजे ४.५ टक्के असतानाही मूर्तींचा वाटा तब्बल १६.२ टक्के आहे. यावरून या तालुक्यात तुलनेने कमी अर्जदारांकडून मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार अथवा विक्री होत असल्याचे दिसते.
३. बार्देशमध्ये ७३ नोंदण्या असून १०,७३१ मूर्ती (१३.९ टक्के) नोंदल्या आहेत. फोंड्यामध्ये ७१ नोंदण्या आणि ९,३४० मूर्ती, तर पेडण्यामध्ये ६९ नोंदण्या आणि ८,४५० मूर्ती आहेत.
डिचोली-बार्देशमध्ये निम्म्याहून अधिक विक्रेते
गणेशमूर्ती विक्रीच्या व्यवसायात डिचोली आणि बार्देश हे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून समोर आले आहेत. एकूण १९१ विक्रीशी संबंधित नोंदण्यांपैकी डिचोलीत ५३ (२७.७ टक्के), तर बार्देशमध्ये ४७ (२४.६ टक्के) विक्रेते आहेत. म्हणजेच या दोन्ही तालुक्यांत मिळून १०० विक्रेत्यांपैकी ५२ पेक्षा अधिक विक्रेते आहेत. त्यांचा एकत्रित वाटा ५२.३ टक्के आहे. फोंडा येथे १७, सासष्टी १४, मुरगाव ११ आणि तिसवाडी १० विक्रेते नोंदले गेले आहेत.
कोल्हापूरकडून गोव्याला मोठा पुरवठा
गणेशमूर्तींच्या पुरवठ्याच्या साखळीमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर हे गोव्यासाठी महत्त्वाचे बाह्य केंद्र असल्याचे नोंदणीच्या आकडेवारीतून दिसते. २११ अर्जदारांपैकी ५७ जणांनी कोल्हापूरचा उल्लेख केला आहे. त्यामुळे गोव्याला मूर्ती पुरविणाऱ्या बाहेरील केंद्रांमध्ये कोल्हापूर आघाडीवर आहे. आणखी १७ अर्जदारांनी महाराष्ट्राचा स्रोत म्हणून उल्लेख केला आहे. त्याचवेळी ३९ अर्जदारांनी गोव्यातूनच मूर्ती घेत असल्याचे नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.