या वर्षाचे पहिले सहा महिने संपण्यास अजून पाच दिवस बाकी असतानाच गाेव्यातील रस्ता अपघातातील मृत्यूंनी दीडशेची संख्या पार केली आहे. १ जानेवारी ते २५ जून या कालावधीत रस्ता अपघातात एकूण १६१ बळींची नाेंद झाली आहे.
गोव्यात प्रत्येक २३ तासांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असून दर आठवड्याला सरासरी सहाजणांना अपघातात मृत्यू येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून पुढे आले आहे.
या महिन्याचा २४ जून हा दिवस गोव्यासाठी पुन्हा एकदा काळाचा घाला घालणारा दिवस ठरला असून या एकाच दिवसात सकाळी ते मध्यरात्रीपर्यंत एकूण पाच जणांचा बळी गेला. यातील याेगायोगाची बाब म्हणजे यातील तीन बळी दुचाकीस्वारांचे तर दाेन बळी पादचाऱ्यांचे होते.
जी उपलब्ध आकडेवारी हाती आली आहे त्यानुसार, यातील ७० टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील आणखी एक भीषण अशी बाब म्हणजे, एक तृतीयांश म्हणजे ३० टक्के रस्ता अपघातातील बळी हे १८ ते ३५ या वयोगटातील असून यातील बहुतेक बळी हे दुचाकी अपघातातील आहेत.
सोमवारी (२४ जून) पहिला अपघात उसगाव येथे सकाळी ८ वा.च्या सुमारास घडला. संजय पेडणेकर (५२) हे रात्रपाळीचे काम संपवून सकाळी घरी येत असताना वाटेत गाय आल्याने त्याच्या दुचाकीचा धक्का गायीला बसून ते खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन ठार झाले.
दुसरा अपघात सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास फातोर्डा-बोलसे सर्कलजवळ घडला. ऑलवीन फर्नांडिस या युवकाचा दुचाकीवरील तोल गेल्याने तो खाली पडून जखमी झाला व त्यातच त्याचे प्राण गेले. तिसरा बळी नावेली येथील इनासियो फर्नांडिस या पादचाऱ्याचा होता.
रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य दोन अपघात रात्रीच्यावेळी झाले. रात्री सुकतळी-मोले येथे दुचाकी घेऊन जाताना तन्वेश रिवणकर याने ट्रकला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला तर मध्यरात्री लाेटली येथे एका अवजड वाहनाने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
मागच्या वर्षी गोव्यात पूर्ण वर्षात २९० जणांचा रस्ता अपघातात बळी गेला होता. यावर्षी पहिल्या १७७ दिवसांतच १५३ जणांचा बळी गेला आहे. मागच्या वर्षातील बळींची संख्या पाहिल्यास गोव्यात दर तिसाव्या तासाला एक बळी जात होता. मात्र, यंदा हे प्रमाण दर २५व्या तासाला एक बळी असे झाले आहे. मागच्या वर्षांतील बळींची आकडेवारी पाहिल्यास गोव्यात एका वर्षाला सरासरी १०० तरुणांचे बळी रस्ता अपघातात जात असल्याचे भीषण सत्य पुढे आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.