

मोरजी: पोकेवाडा-मोरजी येथील बाबा पोके यांच्या गणपती चित्रशाळेने सुमारे दीडशे वर्षांपासून जपलेली चिकणमातीच्या गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा आजही तिसऱ्या पिढीकडून सुरू आहे. आजोबा व वडिलांकडून मिळालेला मूर्तीकलेचा वारसा जपत मूर्तिकार उमाकांत पोके दरवर्षी २५० हून अधिक पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती साकारतात.
आधुनिक काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचा वापर वाढत असताना पारंपरिक मातीच्या मूर्तिकलेचे संवर्धन करण्याचे काम ते निष्ठेने करत आहेत.
उमाकांत पोके यांनी मूर्तीकलेचे प्राथमिक धडे आजोबा बाबा पोके यांच्याकडून घेतले. त्यानंतर वडील आणि काकांनी त्यांना मार्गदर्शन केले. मोठ्या आकाराच्या मूर्ती घडविण्याचे विशेष प्रशिक्षण त्यांनी मुंबईत मूर्तिकार सतीश वलीवाडकर यांच्याकडे घेतले.
मूर्तीचा आकार व प्रमाण, सांगाडा तयार करणे, त्याचा समतोल राखणे आणि त्यावर मातीचे काम करण्याचे तांत्रिक ज्ञान त्यांनी या प्रशिक्षणातून आत्मसात केले.
पीओपी मूर्तींवर पूर्ण बंदीची मागणी
पीओपीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच पारंपरिक मूर्तिकारांच्या व्यवसायावरही परिणाम होत असल्याची खंत पोके यांनी व्यक्त केली. पीओपीच्या गणेशमूर्तींवर पूर्णपणे निर्बंध घालावेत, अशी मागणी पेडणे तालुक्यातील मूर्तिकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.