Kadamba Transport बंद ठेवलेल्या प्रत्येक बसमागे दर दिवशी 22 हजार रुपये दंड वसूल करणार अशी कडक तंबी कदंब वाहतूक महामंडळाकडून मिळाल्यानंतर नमलेल्या 140 इलेक्ट्रिक बसचालकांनी आज आपला संप मागे घेतला.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे म्हणाले, की महामंडळ हैदराबाद येथील एका कंपनीकडून सेवा घेते. सेवेत खंड पडल्यास दर बसमागे 22 हजार रुपये दंड करण्याची अट त्यांच्याशी केलेल्या करारात घालण्यात आली आहे.
अधिक पगारवाढ मागून कालपासून संपावर गेलेल्या कदंब वाहतूक महामंडळासाठी काम करणाऱ्या 140 इलेक्ट्रिक बसचालकांनी आज सायंकाळी आपला संप मागे घेतला. या चालकांच्या कुठल्याही मागण्या अद्याप मान्य केलेल्या नाहीत.
आधी कामावर रुजू व्हा नंतर मागण्यांवर विचार करू असे आश्वासन त्यांना दिल्यावर त्यांनी संप मागे घेतला, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.
कंपनी प्रतिनिधीच्या वाटाघाटी यशस्वी
हे बसचालक काम करत असलेली कंपनी हैदराबाद येथील असून आज त्या कंपनीच्या प्रतिनिधीने मडगाव येथे येऊन चालकांशी वाटाघाटी केल्या. कामात खोडा घातल्यास दंडाचे पैसे संबंधित चालकाकडून वसूल केले जातील असा इशाराही त्यांना दिला.
त्यापूर्वी सकाळी दंडाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही बसचालक कामावर रुजू होण्यासाठी तयार झाले होते, तर काही जणांचा विरोध होता. मात्र, सायंकाळी तो मावळला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.