उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर कोमुनिदादच्या प्रशासकांनी सांगोल्डा येथील कोमुनिदाद मामलत्तेवरील तब्बल २२ बांधकामे पाडण्याचे काम शुक्रवारी (ता. १२) हाती घेतले. येत्या २५ एप्रिलपर्यंत या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करायचा आहे. दरम्यान, दुपारपर्यंत १२ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
सांगोल्डा येथील कोमुनिदाद जागेत तब्बल २२ अनधिकृत बांधकामे उभारली होती. ही घरे बेकायदेशीर असल्याचा ठपका स्थानिक कोमुनिदादने ठेवला होता. २०१२ पासून कोमुनिदाद व या घरमालकांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होती.
येथील सर्व्हे क्र. ८१/१ मधील ही २२ बांधकामे पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. याविषयी या घरमालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा निर्णय कामय ठेवला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही बांधकामे हटविण्याचा आदेश काढला.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर विभाग कोमुनिदाद प्रशासकांना कारवाई पथक ही बांधकामे हटविण्यासाठी आज शुक्रवारी उपलब्ध करून दिले. त्यानुसार, सकाळी ९.३० वाजता कारवाई पथक व मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी हजर झाला.
यावेळी कारवाई पथक व उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासनाने या घरमालकांना घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी वेळ दिला. सुरवातीला काहींनी यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महिलावगनि मोठ्या प्रमाणात आक्रोश केला.
ज्या बांधकामांवर कारवाई केली त्यातील अनेकांनी दावा केला की, मागील ४० ते ५० वर्षांपासून आम्ही इथे वास्तव्यास आहोत. अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हास ही घरे बांधताना विश्वासात घेतले आणि आज शेवटच्या क्षणी अशाप्रकारे आम्हाला वाऱ्यावर सोडले. काहीजणांच्या दाव्याप्रमाणे, त्यांचा व त्यांच्या मुलाबाळांचा जन्म सांगोल्डामधील आहे.
"चाळीस वर्षांपासून हे लोक सांगोल्डामध्ये वास्तव्य करत आहेत. त्यामुळे मानवतावादी दृष्टीकोनातून या लोकांचा विचार झाला पाहिजे. सरकारने तसेच स्थानिक आमदारांनी पुढाकार घेत या लोकांना इतरत्र निवारा देण्याची जबाबदारी स्वीकारावी. या लोकांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात आहे. काही लोकप्रतिनिधींच्या विरोधात देखील न्यायालयाचे निर्देश आहेत, मग त्याची कार्यवाही का होत नाही? मी बेकायदेशीरपणाला पाठिंबा देत नाही, परंतु त्यांच्या पुनर्वसनाचा विचार झालाच पाहिजे," असे माजी आमदार जयेश साळगावकर म्हणाले.
बेकायदेशीर घरे पाडण्याच्या प्रक्रियेवेळी एकजण आपल्या घराच्या छतावर चढून नळे काढताना घसरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. सायंकाळच्या वेळेस ही दुर्घटना घडली. जखमीला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार असा निर्धार या बेघरांनी केला. सरकारने आम्हाला इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी. फक्त निवडणूकांपुरती आमची मते मागण्यासाठी आमच्या दारी लोकप्रतिनिधी व सरकारला आमची गरज असते का? आमच्यावर हा अन्याय का? असा प्रश्न संबंधितांनी उपस्थित केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.