Goa: गोव्याच्या निसर्गरम्य देवभूमी प्रदेशात वसलेले, ‘सांत्रु प्रोमोतोर दि इंस्ट्रुसांव’ (‘सीपीआय’ किंवा ‘सांत्रु’ या नावाने प्रचलित) ही संस्था इंग्रजीत ''सेंटर फॉर प्रमोशन ऑफ इंस्ट्रक्शन'' किंवा मराठीत ''विद्या प्रसारक मंडळ'' या अनुषंगाने आपल्या शतकोत्तर वाटचालीत परिवर्तनशील शिक्षणाची, प्रखर राष्ट्रवादाची, व सांस्कृतिक संवर्धनाची मूक साक्षीदार ठरली आहे.
देळे - काणकोण येथे ‘ज्ञान प्रबोधिनी’ मंडळाच्या ‘श्री मल्लिकार्जुन आणी श्री चेतन मंजू देसाई’ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सुमारे साडेचार वर्षे सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले. माझ्या काणकोणातील कार्यकाळात तेथिल काही शैक्षणिक संस्थांची वाटचाल, शिक्षणाचे संदर्भ, त्यांचा वस्तुनिष्ठ इतिहास आणि समृद्ध वारसा आत्मसात करण्याची संधी मिळाली.
सांत्रु या शैक्षणिक संस्थेचे माझे निरीक्षण, सहवास, आणि विशेषत: तिचे व्यवस्थापन संभाळणाऱ्या समाजप्रेरित मित्रवर्गामुळे मला तिचा चिरस्थायी प्रवास आत्मसात करण्यात मदत झाली. शंभरी साजरी करणाऱ्या या संस्थेच्या सखोल भूमिकेचा अभ्यास मांडण्यासाठी ‘दैनिक गोमंतक’ या माध्यमातून मला संधी मिळावी हे माझे भाग्यच !
शतकी वाटचाल करणाऱ्या ऐतिहासिक ‘सांत्रु'' संस्थेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाचे हरहुन्नरी अध्यक्ष श्री शंभा मोलू देसाई, सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष समाजसेवक व काणकोणचे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र दत्ता देसाई यांनी पुढील शंभर वर्षांच्या वाटचाली साठी यथोचित व योजनाबद्ध मांडणी केली असून, शतकमहोत्सवी कार्यक्रमाची प्रभावी आखणी करणाऱ्या महोत्सव समितीचे अध्यक्ष इंजि.विकास देसाई, सर्व कार्यकारी मंडळ, सभासद, आजीमाजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि कर्मचारी वर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
गोव्यातील शिक्षण इतिहासामधील सुवर्ण पान
गोव्यातील शालेय शिक्षणाच्या प्रदीर्घ 136 वर्षांच्या दैदिप्यमान इतिहासात सीपीआय संस्थेने मोलाची भर घातली आहे. माझ्या या विषयावरील अभ्यासानुसार गोव्यातील 100 वर्षांचा इतिहास असलेली ही आठवी शैक्षणिक संस्था असून आजतोवर ती जोमाने कार्यरत आहे.
हडफडे-गोवा येथील ‘सेंट जोसेफ’ हायस्कूल ही गोव्यातील पहिली (इंग्रजी माध्यमाची) शाळा. साल 187 मध्ये ख्रिस्तवासी विल्यम रॉबर्ट लेऑन्स (फा. लेऑन्स) यांनी तिची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर गोव्यात मराठी शिक्षण व संस्कृतीची कास धरण्यासाठी पणजीतील ‘मुष्टीफंड’ संस्था, तसेच म्हापसा येथील ‘ज्ञान प्रसारक विद्यालय’ यांची स्थापना त्याच वर्षी (18 जून) साल १९०८ मध्ये झाली. म्हापश्यातील वैश्य वाणी समाजाकडून ''विद्याप्रसारकची'' प्रेरणा घेत ‘सारस्वत विद्यालयाची’ स्थापना २ मार्च १९११ रोजी झाली.
‘गोवा विद्याप्रसारक मंडळ’ (जीव्हीएम) ही फोंडा-दक्षिण गोव्यातील पहिल्या शाळांपैकी एक असुन ‘लिगा दा प्रोपागंदू दि इंस्ट्रुसांव इम गोवा’ या नांवाने ओळखली जात असे. या गौरवशाली संस्थेची स्थापना श्री दादा वैद्य, श्री विनायक सरज्योतिषी आणि श्री सीताराम केरकर यांनी २ ऑक्टोबर १९११ साली केली, तर काणका-वेर्ले येथील ‘सेक्रेड हार्ट’ स्कूलची स्थापना क्रिस्तवासी श्री वॉल्टर डिसोझा यांनी ५ जानेवारी १९१२ रोजी केली होती.
त्या भागातील श्री खलप यांचा निवास्थानातील आणि सध्याच्या शाळेच्या आवारात सेक्रेड हार्ट’ कार्यरत होती. साल १९१३ मध्ये डॉ. केशव मोर्तोबा भांडारी यांनी कुंभारजुवे येथे ‘श्री शारदा’ विद्यालयाची स्थापना करून लागलीच तेथून शालेय उपक्रमांचा पाठपुरावा करण्यात आला. पुढील काळात हि संस्था ‘सामंत गुरुजींची शाळा’ म्हणून प्रसिद्धीस पावली.
एकेकाळी काणकोणतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्मलघाट ओलांडून केपे, सावर्डे - कुडचडे -बाणास्तरी अशी मजल दरमजल करत फोंडा – कुंभारजुवा- पणजी येथे दुसऱ्यांच्या घरीं आसरा घेत शिक्षणाची गरज पूर्ण करावी लागे. बहुजन समाजातील, गरीब सामान्य होतकरुंच्या नशिबात शिक्षण घेण्याची शक्यताच नव्हती.
असे मानले जाते की १९१८ मध्ये फोंडा येथे शिकत असलेल्या काणकोणतील तरुण मुलाचा टायफॉइडच्या साथीने मृत्यू झाला, ज्यामुळे काणकोण तालुक्यातील शैक्षणिक उन्नतीची गरज काही दूरदर्शी लोकांना जाणवली.
28 डिसेंबर 1922 रोजी ‘सांत्रु प्रोमोतोर दि इंस्ट्रुसांव’ या संस्थेची स्थापना काणकोण मधील सामाजिक सलोखा मानणाऱ्या बुध्दीवादी मित्रवर्गाने केली. काणकोणतील येथील चार-रस्ता येथे काही खाजगी घरांमध्ये पहिल्या ''मराठी शाळेची’ सुरुवात केली. या उदात्त उपक्रमाला ३ सप्टेंबर 1923 रोजी तत्कालीन पोर्तुगीज राज्यपाल दोतोर जैमि अल्बेर्तु दि काश्ट्रू मोराईश यांच्या मान्यतेची मोहर मिळाली व त्यानंतर २ ऑक्टोबर १९२३ रोजी संस्थेची नोंदणी करण्यात आली.
सुरुवातीच्या काळात श्री. जिबलो गाणबा देसाई, लक्ष्मण डी. नगर्सेकर, सुब्राय शेणवी, शिवराय दलाल, शिवराम एफ. देसाई, गणबा डी. देसाई, भिकू येसो नाईक गांवकर, डॉ. विठ्ठल जिबलो देसाई, विठ्ठल गांवकर, साजरोबा एम. गायतोंडे यांनी गोवा स्वतंत्र हॊइ पर्यंत संस्थेची धुरा निष्ठेने सांभाळली व संस्थेला आकार, चेहरा आणि चारित्र्य दिले. सांत्रु प्रोमोतोरचा पाया घातल्यानंतर या शाळेला ‘इन्स्टिट्यूत दि लाईसेल’ या नावाने ओळखत असत आणि आज ती ‘सांत्रु प्रोमोतोर दि इंस्ट्रुसांव’ (सीपीआय) संचलित ‘श्री मल्लिकार्जुन शाळा’ म्हणून ओळखली जाते.
कोणतेही सरकारी अनुदान नसताना स्वखर्चाने, स्वेच्छेने कार्य करत, काणकोणतील तत्कालीन ‘काम्र’ (नगरपालिका), श्री जीवोत्तम पर्तगाळ मठ, व श्री मल्लिकार्जुन संस्थानाच्या मदतीने मोठ्या जिद्दीने शाळेचा कारभार चालला.
साल १९५८ मध्ये भारताच्या पोर्तुगीज राज्याचे १२८ वे (आणि शेवटचे) गव्हर्नर-जनरल म्हणून इंजिनेर मॅन्युएल अँटोनियो व्हॅसालो ई सिल्वा नामांकित झाले, व त्यांनी दिलेल्या उदार हातभारामुळे शाळेच्या प्रथम खोलीची निर्मिती झाली. एक छोटीशी शाळा नंतर बांधली गेली.
स्वतंत्र गोव्यात भाऊसाहेब बांदोडकरांचे राज्य आल्या नंतर शिक्षणाची कवाडे संपूर्ण राज्यात उघडली व या संस्थेने नवी उभारी घेतली. या नंतरच्या काळांत श्री. फटी कुष्ठा नाईक खालवडेकर, विठोबा पी. देसाई, मंजू बाळकृष्ण गांवकर, डॉ. वेंकटेश प्रभुदेसाई, वसंत देसाई, सदाशिव एस. देसाई, कुष्ठा नाईक गांवकर,
महेंद्र शिवराम देसाई, राजेंद्र दत्ता देसाई, विकास देसाई, अनंत सावंत, अनिल देसाई ते शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्याचा मान श्री मल्लिकार्जुनची सेवा म्हणून स्वीकारणारे विद्यमान अध्यक्ष श्री. शंभा मोलू नाईक देसाई पर्यंत सर्वांनी या संस्थेच्या उभारणीस हातभार लावला आहे. संस्थेच्या वाटचालीत श्री. मोर्तोबा गावकर, शांताराम किन्नरकर, भालचंद्र काणकोणकर, आनंदराव राजाध्यक्ष आदी विभूतींचे कार्य तेवढेच मोलाचे ठरावे.
शिक्षणाचा दीपस्तंभ
सीपीआय संस्थेकडून प्रेरणा घेत काणकोण तालुक्यात इतर समाजसुधारकांनी आपापल्या गांवांमधून शिक्षणाचा मार्ग प्रशस्त केला. चार रस्ता हे काणकोणचे केंद्रवर्ती ठिकाण जरी असले तरीही पणसुले, खोतीगाव, लोलये, शेळी, पैंगिणी, सदोळशे, गांवडोंगरी या अंतर्गत भागांतील विद्यार्थ्यांसाठी ते खूप दूर होते.
या ग्रामीण भागांत शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सर्वप्रथम लोलये येथील ‘श्री दामोदर’ विद्यालयाने १९२४ मध्ये श्री केशव देव मंदिराच्या परिसरातून आपला शिक्षणप्रसार प्रवास सुरू केला, आणि ‘निराकार’ विद्यालयाच्या नोंदी प्रमाणे १९३९ च्या सुमारास श्री निराकर मंदिराच्या आवारात आणि त्यानंतर मंदिराच्या अग्रशाळेतून सुरू झाला.
श्री दामोदर विद्यालय यावर्षी शतकी वाटचाल करत असून, पणसुले येथील ‘श्री कात्यायनी बाणेश्वर’ विद्यालयाला ९४ वर्षे पूर्ण होत असून, १९३३ साली स्थापन् झालेले ‘श्रद्धानंद’ विद्यालय ९० वर्षे पूर्ण करून शंभरीकडे वाटचाल करत आहेत.
सीपीआयच्या संस्थापकांची दूरदृष्टी आणि प्रयत्न बरोबरीनेच या संस्थेत प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या शिक्षकवर्गाचे श्रम मोलाचे ठरले. श्री. एच. आर. प्रभू (ह रा प्रभू मास्तर), सादोळशे येथील आणि कारवार येथील सर्वात जुन्या इंग्रजी शाळांपैकी एक असलेल्या हिंदू हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. यशवंत अनंत नायक (नायक मास्तर) या शिक्षकांचे कष्टाळू प्रयत्न फळास आले.
त्यानंतर श्री. भिकू नाईक गावकर, बाबनी देसाई, दिगंबर नगर्सेकर, अनंत गावकर, मार्टिन मेनिन फर्नांडिस, लक्ष्मण देसाई, न्यू इरा हायस्कूल मडगावचे माजी शिक्षक राम भट, कृष्णराव महाडिक, प्रदिप शहापूरकर, एम के. कामत आदींनी मोलाचे योगदान दिले. क्रमश:
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.