

Yash Dayal Bail Rejected: आयपीएल 2026 च्या हंगामासाठी सज्ज होत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. एका अल्पवयीन मुलीने यश दयालवर बलात्कारासारखे अत्यंत गंभीर आरोप केले. या प्रकरणी आता जयपूरमधील पॉक्सो न्यायालयाने त्याला मोठा दणका दिला. न्यायालयाने दयालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून यामुळे आगामी आयपीएल हंगामापूर्वी आरसीबीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयपूर महानगर न्यायालयातील (पॉक्सो कोर्ट-3) न्यायाधीश अलका बन्सल यांनी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण आदेश सुनावला. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, आतापर्यंत रेकॉर्डवर असलेल्या पुराव्यांवरून आणि तपासाच्या प्राथमिक टप्प्यावर यश दयालला या प्रकरणात जाणीवपूर्वक किंवा खोट्या पद्धतीने गोवण्यात आले आहे, असे ठोसपणे सिद्ध होत नाही. पुराव्यांची गंभीरता लक्षात घेता न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. या निर्णयामुळे यश दयालवर आता कोणत्याही क्षणी अटकेची टांगती तलवार निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर आणि आरसीबीच्या रणनीतीवर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, यश दयालच्या वकिलांनी न्यायालयात (Court) आपली बाजू मांडताना हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले. वकिलांच्या दाव्यानुसार, यश आणि संबंधित मुलीची भेट केवळ सार्वजनिक ठिकाणी झाली होती आणि ते कधीही एकांतात भेटले नाहीत. इतकेच नाही तर त्या मुलीने स्वतःला सज्ञान असल्याचे भासवले होते. आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून तिने यशकडून वेळोवेळी पैसे उकळले आणि त्यानंतर अधिक पैशांसाठी ती सातत्याने ब्लॅकमेल करत होती, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र, सध्या तरी न्यायालयाने हा बचाव ग्राह्य न धरता पोलीस तपासाला प्राधान्य दिले.
आरसीबीसाठी (RCB) ही बातमी 'बॅड न्यूज' मानली जात आहे, कारण फ्रँचायझीने आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी यश दयालवर मोठा विश्वास दाखवत त्याला 5 कोटी रुपयांच्या भरभक्कम रकमेवर रिटेन केले. गेल्या दोन हंगामात त्याने संघासाठी मोलाची भूमिका बजावली. 2025 च्या हंगामात त्याने 15 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या, तर 2024 मध्ये 14 सामन्यांत 15 विकेट्स मिळवून त्याने स्वतःला सिद्ध केले होते. जर हे कायदेशीर प्रकरण लांबले आणि यश दयाल आयपीएल 2026 मधून बाहेर पडला, तर आरसीबीला ऐन वेळी त्याच्या जागी नवीन गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल, जे संघासाठी मोठे तांत्रिक आणि मानसिक नुकसान ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.