

Virat Kohli ICC ODI Ranking: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीने 2026 या वर्षाची सुरुवात एका ऐतिहासिक कामगिरीने केली. आयसीसीने (ICC) वर्षातील पहिली ताजी एकदिवसीय क्रमवारी (ODI Ranking) जाहीर केली असून यात विराट कोहलीने पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज केले. सुमारे चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोहली अव्वल स्थानी पोहोचला. मात्र, दुसरीकडे भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला या क्रमवारीत मोठा फटका बसला असून त्याची पहिल्या स्थानावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.
विराट कोहलीने (Virat Kohli) तब्बल 1403 दिवसांनंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाची खुर्ची पुन्हा मिळवली. 2026 सालातील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 93 धावांची विस्फोटक खेळी केल्याचा थेट फायदा कोहलीला मिळाला. गेल्या पाच एकदिवसीय डावांत विराटने एकदाही 50 पेक्षा कमी धावसंख्या केलेली नाही. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची रेटिंग आता 785 वर पोहोचली आहे. याआधी तो दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु किवींविरुद्धच्या 93 धावांनी त्याला एका स्थानाचा फायदा मिळवून दिला.
कोहली जरी पहिल्या क्रमांकावर पोहोचला असला, तरी त्याचे स्थान अद्याप सुरक्षित म्हणता येणार नाही. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरिल मिचेल यालाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो 784 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, विराट आणि मिचेल यांच्यात केवळ एका रेटिंग पॉईंटचा फरक आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका सुरु असल्याने पुढील सामन्यांतील कामगिरीनुसार या दोघांमध्ये पुन्हा चढाओढ पाहायला मिळू शकते.
या क्रमवारीतील सर्वात धक्कादायक बदल म्हणजे रोहित शर्माची घसरण. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेला रोहित आता थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितने 29 चेंडूत केवळ 26 धावा केल्या होत्या. ही खेळी आपली रेटिंग टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी ठरली नाही. रोहितची रेटिंग आता 775 वर आली असून तो विराट आणि मिचेल यांच्यापेक्षा 10 गुणांनी मागे आहे. पुन्हा अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी रोहितला राजकोट आणि इंदूर येथील आगामी सामन्यांत मोठी खेळी करावी लागणार आहे.
2026 या वर्षात आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आलेले नाही, परंतु कोहली ज्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत आहे, ते पाहता त्याचे शतक आता केवळ औपचारिकता उरली आहे. विराट ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याचा फायदा भारतीय संघाला (Team India) न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी निश्चितपणे होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.